पॅरिस आणि कॅलिफोर्नियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकेमध्ये मुस्लिमांविरोधात द्वेष भावनेतून गुन्हे घडण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. अमेरिकी मुस्लिम आणि तेथील मशिदींवर छोटे-मोठे हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे एका अभ्यासातून दिसून आले. साधारणपणे महिन्याभराच्या कालावधीत अशी डझनभरापेक्षा जास्त प्रकरणे उघडकीस आली आहेत.
बुरखा घातलेल्या विद्यार्थिंनींची छेड काढणे, मशिदींमधील वस्तूंची तोडफोड करणे, मुस्लिम व्यावसायिकांना धमकावणे, काही ठिकाणी गोळीबार करणे, अशा घटना गेल्या महिन्याभरात वाढल्याचे दिसून आले. कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका संशोधन गटाने याचा अभ्यास केल्यावर त्यांना पॅरिस आणि कॅलिफोर्नियातील दहशतवादी हल्ल्यांनंतर मुस्लिमांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
या घटना पुढे आल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वतः अशा हल्लेखोरांना सक्त ताकीद दिली. त्याचबरोबर मानवाधिकार कार्यकर्त्यांनीही या प्रकाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडूनही मुस्लिमांविरोधात वक्तव्य केली जात आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याची मागणी केली होती.