राजस्थानातील सत्तासंघर्षांच्या नाटय़पूर्ण घडामोडीत शुक्रवारी काँग्रेसने, भाजपवर गेहलोत सरकार पाडण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना लाच दिल्याचा गंभीर आरोप केला. या कथित प्रकरणात केंद्रीय जलशक्तिमंत्री गजेंद्र शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा आरोप शेखावत यांनी फेटाळला असून आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे पत्रकारांना सांगितले.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषदेत कथित ध्वनिफितीचा उल्लेख करत त्यातील तिघांच्या संभाषणाची माहिती दिली. ही ध्वनिफीत पत्रकारांना ऐकवण्यात आली नाही. या कथित ध्वनिफितीत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, काँग्रेसचे आमदार भवरलाल शर्मा आणि जयपूरस्थित व्यापारी संजय जैन हे तिघे गेहलोत सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना लाच देण्यासंदर्भात एकमेकांशी बोलत असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून जैन यांना अटक करण्यात आली. काँग्रेसचे बंडखोर आमदार विश्वेंदर सिंह आणि भवरलाल शर्मा यांना काँग्रेसने निलंबित केले. शर्मा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. कथित ध्वनिफितीतील आवाज माझा नाही. मला चौकशीला बोलावले तर मी नक्कीच जाईन, अशी प्रतिक्रिया केंद्रीय जलशक्तिमंत्री शेखावत यांनी दिली. काँग्रेसने कोणत्या जैन यांचा उल्लेख केला माहिती नाही. पण, या नावाचे अनेक जण असतात. मी जैन यांच्याशी बोललो असेन तर माझा फोन क्रमांकही असेल. तुम्ही (तपास यंत्रणा) चौकशी करू शकता, असे शेखावत म्हणाले. गेल्या सहा महिन्यांपासून भाजप सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.

राजस्थान पोलिसांना हरियाणात रोखले

राजस्थानमधील बंडखोर काँग्रेस आमदारांना गुरगांवमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा असून, या हॉटेलमध्ये शुक्रवारी सायंकाळी तपासासाठी प्रवेश करू पाहणाऱ्या राजस्थान पोलिसांच्या पथकाला हरियाणा पोलिसांकडून अडविण्यात आल्याचे वृत्त आहे. राजस्थानमधील काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारविरुद्ध बंड पुकारलेल्या काही काँग्रेस आमदारांना या हॉटेलमध्ये आश्रय देण्यात आल्याचे समजते. हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे. बंडखोर काँग्रेस आमदारांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी राजस्थान पोलिसांनी विशेष कार्य गटाचे पथक हरियाणात पाठविले आहे.

पायलट गटाला तूर्त दिलासा

सचिन पायलट व त्यांच्या समर्थक १८ आमदारांविरोधात मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कोणतीही कारवाई करण्यास राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मनाई केली. त्यामुळे पायलट गटाला तूर्त दिलासा मिळाला आहे. विधानसभाध्यक्ष सी. पी. जोशी यांनी शुक्रवारी पाच वाजेपर्यंत नोटीस बजावलेल्या आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांच्या अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र उच्च न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कारवाई न करण्याचा हंगामी आदेश खंडपीठाने दिला. पुढील सुनावणी सोमवारी २० जुलै रोजी होणार आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू  नसल्याने विधानसभाध्यक्षांना नोटीस पाठवण्याचा अधिकार नाही. तसेच, आमदारांनी पक्षविरोधात कोणतेही कृत्य केलेले नाही, असा युक्तिवाद पायलट गटाच्या वतीने केला गेला.