दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठा यांची माफी मागितल्यानंतर पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या शाखेत फूट पडली आहे. केजरीवाल यांनी माफी मागून शरणागती पत्करली असून, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया पंजाब शाखेने दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष भगवंत मान, सहप्रदेशाध्यक्ष अमन अरोरा यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच लोक इन्साफ पक्षाने आपची असलेली आघाडी तोडली आहे. केजरीवाल यांनी अकाली दलाशी संधान बांधल्याचा आरोप होत असल्याची टीका आपच्या राज्यातील नेत्यांनी केली आहे. आपच्या आमदारांची शुक्रवारी बैठका झाल्या. त्यात सर्वच आमदारांनी केजरीवाल यांनी राज्यातील नेत्याशी चर्चा न करता माफी मागितल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पुढील निर्णय काय घ्यायचा याबाबत आमदार पर्याय पडताळून पाहात आहेत. दिल्ली शाखेपासून वेगळे व्हावे अशी पंजाबमधील बहुसंख्य आमदारांची मागणी आहे.

आज दिल्लीत बैठक

पंजाबमधील आमदारांच्या नाराजीची दखल आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाने घेतली आहे. पक्षाचे आमदार रविवारी नवी दिल्लीत पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना भेटणार आहेत. बहुसंख्य आमदार वेगळा पक्ष स्थापन करण्याबाबत आग्रही आहेत.