दिल्लीचे तख्त काबीज करणाऱ्या आम आदमी पक्षात (आप) अंतर्गत मतभेद असल्याची कबुली खुद्द पक्षाच्या प्रवक्त्यांकडूनच देण्यात आली. ‘आप’चे प्रवक्ते संजय सिंह यांनी सोमवारी दिल्लीमध्ये यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सांगितले. अरविंद केजरीवाल यांना पक्षाच्या संयोजक पदावरून दूर करण्यासाठी पक्षांतर्गत अनेक हालचाली सुरू असल्याचे संजय सिंह यांनी सांगितले. अशाप्रकारच्या कृतीने पक्षातील काही लोकांनी आम्हाला विनोदाचा विषय बनविल्याचे सांगत संजय सिंह यांनी आपली उद्गिग्नता व्यक्त केली. तर दुसरीकडे या वादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या योगेंद्र यादव यांनी ही सर्व वृत्ते निराधार ठरवत पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले.

त्यामुळे दिल्लीत विक्रमी बहुमताने सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाला अंतर्गत कलहाचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आप’चे ज्येष्ठ नेते प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांनी पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट काही आरोप केले आहेत. केजरीवाल यांनी पक्षाच्या तत्त्वांचे आणि अन्य काही गोष्टींचे उल्लंघन केल्याची टीका प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्याकडून करण्यात आली.
मात्र, केजरीवालांना बाजूला सारण्यासाठीच प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्याकडून अशाप्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. केजरीवाल यांना ‘आप’च्या राष्ट्रीय संयोजक पदावरून दूर करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना कदाचित कार्यकर्त्यांच्या मनातील भावना माहिती नसाव्यात, असे सांगत आपच्या राजकीय समितीचे सदस्य संजय सिंग यांनी एकप्रकारे यादव आणि भूषण यांच्यावर जाहिररित्या तोफ डागली आहे. ‘आप’ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६७ जागा मिळूनही केजरीवाल यांच्या राजकीय दृष्टीविषयी शंका उपस्थित केली जात आहे. जर पक्षाला निवडणुकीत फक्त २० जागाच मिळाल्या असत्या तर, या लोकांनी त्यांची काय अवस्था केली असती, असा सवाल ‘आप’च्या सोशल मिडीया प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या अंकित लाल यांनी उपस्थित केला. त्यामुळे ‘आप’मधील अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणावर उघड झाला. गेल्या आठवड्यात आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय संयोजक पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला होता. त्यानंतर प्रशांत भूषण यांच्यामार्फत सरकारमध्ये अरविंद केजरीवाल यांना अनेक कामे असतील. त्यामुळे योगेंद्र यादव यांना राष्ट्रीय संयोजक करण्यात यावे, असा प्रस्तावही मांडण्यात आला होता. मात्र हा प्रस्तावही कार्यकारिणीने एकमताने फेटाळला होता.
याशिवाय, राजकीय सूत्रांच्या माहितीनूसार आगामी काही दिवसांमध्ये योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पक्षाच्या संसदीय समितीमधून डच्चू दिला जाणार असल्याचेही समजते. दिल्लीच्या निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल या दोघांची पक्षाच्या संसदीय कामकाज समितीमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.

केजरीवाल यांच्यावरून पक्षात मतभेद?