नवी दिल्ली : वाहन विक्रीबाबत दशकातील सुमार प्रवास नोंदविणाऱ्या भारताच्या उद्योग क्षेत्रावर रोजगार कपातीचे संकट घोंघावत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मागणीअभावी गेल्या काही महिन्यांपासून वाहन उत्पादन कमी करणाऱ्या कंपन्यांकडून आता रोजगारातील कपातही केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सलग आठव्या महिन्यात विक्रीतील घसरण नोंदविणाऱ्या जूनमधील या क्षेत्राचा प्रवास नुकताच स्पष्ट झाला. आघाडीच्या मारुती सुझुकीसह अनेक अग्रणी कंपन्यांना यंदाही वाहन विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागले.

वाहन उत्पादक कंपन्यांची संघटना असलेल्या खुद्द ‘सिआम’नेच आता या क्षेत्रातील रोजगारावर कुऱ्हाड चालविली जाण्याची शक्यता वर्तविली आहे. वाहन निर्मितीत सध्या नव्या नोकरभरतीचे प्रमाण नगण्य आहे. मात्र विक्रीतील घसरणीचा असाच क्रम राहिला तर कंपन्यांना आहे ते मनुष्यबळही कमी करावे लागेल, असे संघटनेचे अध्यक्ष राजन वढेरा यांनी म्हटले आहे. सध्या प्रवासी तसेच व्यापारी वाहनांची निर्मिती ही गेल्या सहा वर्षांमधील किमान स्तरावर आहे, असे स्पष्ट करत केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) कपातीसारखा लाभ दिला तरच या क्षेत्राला हातभार लागेल, असे नमूद केले.

परिस्थिती काय?

भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रात सध्या ३.७० कोटी रोजगार आहेत. मात्र गेल्या काही सलग विक्री घसरणीमुळे कंपन्यांनी वाहन उत्पादनही कमी केले आहे. अनेक कंपन्यांनी त्यांची विक्री दालने संख्याही आखडती घेतली आहेत. भारत-४सारखी प्रदुषणविषयक मानक अंमलबजावणी, इंधनाचे चढे दर, चलनातील अस्थिरता, रोकड चणचण आदी आव्हानेही या व्यवसायापुढे आहेत.