देशात करोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत असताना अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधा कमी पडत असल्याचं दिसत आहे. रेमडेसिवीरसोबतच ऑक्सिजनचा होणारा तुटवडा अनेक राज्यांसाठी चितेंची बाब ठरली आहे. राजधानी दिल्लीत ५०० करोना रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. वेळ हातातून निघून चालली असतानाच ऑक्सिजनचा टँकर पोहोचला आणि सर्वांना दिलासा मिळाला.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात ऑक्सिजन संपत आला असल्याचं सांगितल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन टँकर रुग्णालयात पोहोचला. रुग्णालयात गंभीर प्रकृती असणाऱ्या ५०० करोना रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात रात्री २ वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक होता.

नाव जाहीर न करण्याच्या अटीवर डॉक्टरांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही सर्वांनीच आशा सोडली होती. वेळ निघून चालली होती. रुग्णालयात दाखल ५०० रुग्णांना या परिस्थितीची माहिती द्यावी असंही आम्हाला वाटत नव्हतं. काहीतरी चमत्कार व्हावा यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत होतो. ऑक्सिजन टँकर आल्याचं पाहून आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं”.

सत्येंद्र जैन यांनी ट्विट करत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी ट्विटमध्ये काही स्क्रीनशॉटही जोडले होते.

त्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे तात्काळ दिल्लीला ऑक्सिजन पुरवठा करावा अशी विनंती केली होती. शहरात ऑक्सिजन संकट असून रुग्णालयांमध्ये पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नाही.

दिल्लीत करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी दिल्लीत २८ हजार ३९५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. करोनाचा फैलाव सुरु झाल्यापासूनचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.