News Flash

भारताच्या करोनास्थिती हाताळणीवर जगातून टीका

दुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून केंद्र सरकारच्या आत्मसंतुष्टतेचे वाभाडे

देशात दररोज करोनारुग्णांचा आणि विषाणूच्या बळींचा नवा कळस समोर येत असताना जगभरातील माध्यमांनी भारताच्या करोना हाताळणीतील दोष दाखवताना टीकेचा चढा सूर लावला आहे.

दुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे. काही ठिकाणी त्याचा काळा बाजारही होत आहे. दिल्लीत रुग्णच प्राणवायू सिलिंडर घेऊन येताना दिसले. गेल्या वर्षी स्थलांतरितांचे जे लोंढे दिसले त्याची पुनरावृत्ती यावेळीही झाली. या वास्तवाचे तपशिलात वृत्तांकन आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलेले आहेच, पण परदेशी दैनिकांच्या वृत्तलेख व संपादकीयांनी भारतीय नेतृत्वाच्या गफलतींचाही पाढा वाचला आहे.

‘‘पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वत:च्या आकलनाने काही निर्णय घेतले. तज्ज्ञांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या चुकांचे परिणाम आज भोगावे लागत आहेत’’ असे ब्रिटनच्या गार्डियन वृत्तपत्राने अग्रलेखात म्हटले आहे. ‘‘नरेंद्र मोदींच्या अतिआत्मविश्वासामुळे हे सारे घडले. मोदींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्बंध कसे राखावेत याचा विचार करायला हवा होता. आपण जे बोलतो ते करतो हे दाखवायला हवे होते. भविष्यातील इतिहासकार या निर्णयांबाबत मोदींचे कठोर मूल्यमापन करतील,’’ असेही या अग्रलेखात म्हटले आहे. अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या महत्त्वाच्या वृत्तपत्राने भारतात टाळेबंदी फार आधी लावली गेल्याबाबत टीकास्त्र सोडले आहेच आणि दुसरी लाट वाढत असूनसुद्धा क्रिकेट, कुंभमेळा आणि इतर धार्मिक कार्यक्रम कुठल्याही नियमनाविना साजरे झाल्याबद्दल त्यांनी केंद्रीय नेतृत्त्वाचे वाभाडे काढले. हे सारे टाळता आले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  ‘बीबीसी’ने भारतीय आरोग्य यंत्रणेतील ढिसाळ कारभारावर बोट ठेवले.

‘‘या सगळ्यास पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत. अनेक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मंत्रिमंडळातील मंत्री खुशामतखोर आहेत; त्यांनी कोविड १९ लाट यशस्वीपणे हाताळल्याबाबत मोदींची प्रशंसा तेवढी केली. त्यानंतर चाचण्याही कमी झाल्या. लोक विषाणू गेला असे वर्तन आत्मसंतुष्टतेतून करू लागले ते अंगाशी आले आहे.’’ – असे परखडपणे सुनावणाऱ्या वृत्तलेखात ‘टाइम’ साप्ताहिकाने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील परिस्थितीही राज्यातील राजकारण्यांनी एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण केल्याने बिघडली. विषाणूची लाट परत आली तेव्हा हे गाफील होते व जेव्हा खरे काही करायचे होते तेव्हा राजकारण करीत राहिले, असेही ‘टाइम’च्या लेखात म्हटले आहे.

‘‘कोविड १९ बाबत आत्मसंतुष्टता भारताला नडली त्यामुळे आताची दुरवस्था ओढवली आहे. रुग्णांची संख्या खूप वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे. पण हा सगळा प्रकार योग्य धोरणे राबवली असती तर टाळता आला असता,’’ असे ऑस्ट्रेलियाच्या ‘एबीसी’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ आणि पाकिस्तानच्या ‘डॉन’ वृत्तपत्रानेही भारताच्या करोना हाताळणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भारताने निर्बंध फार लवकर शिथिल केल्याने ही लाट आली.  साथीत वेळ व अंतराला महत्त्व असते हे सगळे जण विसरून गेले. – वॉशिंग्टन पोस्ट

चुकीच्या निर्णयांनी भारताने करोनाचा पेच आणखी गंभीर केला त्यात आत्मसंतुष्टताही भोवली. करोना रोखण्यातील भारताचे सातत्याने अपयश हे जागतिक परिणाम करणारे आहे. – न्यूयॉर्क टाइम्स

मोदींचा अतिआत्मविश्वास भोवला. भारताने दुसऱ्या लाटेला जो  प्रतिसाद दिला त्यात अनेक कच्चे दुवे आहेत. यातून इतर देशांनी  धडा घेण्यासारखे आहे. – द गार्डियन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 1:00 am

Web Title: criticism from around the world on india handling of the corona situation akp 94
Next Stories
1 उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात ८ ठार
2 प्राणवायूपुरवठा रोखल्यास फासावर चढवू…
3 प्राणवायूचे क्रायोजेनिक कंटेनर सिंगापूरहून भारतात
Just Now!
X