शनिवारी झालेल्या निवडणुकीत भारताच्या उपराष्ट्रपतिपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) व्यंकय्या नायडू हे विराजमान झाले. या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या सुमारे २४ खासदारांनी नायडूंना मतदान केल्याचा दावा भाजपमधील सूत्रांनी केला आहे. नायडू यांना ५१६ मते मिळाली. त्यांना सुमारे ४९५ मते पडतील अशी भाजपची अपेक्षा होती.

माजी केंद्रीय मंत्री नायडू यांना ६८ टक्के तर विरोधी पक्षाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना ३२ टक्के मते मिळाली. विरोधी पक्षांसाठी हा चिंतेचा विषय आहे. गांधी यांना राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यापेक्षा १९ मते अधिक मिळाली असली तरी त्यांना ४० खासदारांचे जास्तीचे समर्थन मिळाले होते. त्या तुलनेने त्यांची काही मते नायडू यांना गेली. मीरा कुमार यांना २२५ मते मिळाली होती. तर गांधी यांना २४४ मते मिळाली.

बिजू जनता दल २८ आणि संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) १२ खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराचे समर्थन केले असले तरी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाला साथ दिली होती. विरोधी पक्षाला जी ४० मते मिळणार होती. त्यापैकी त्यांना सहाच मते मिळाल्याचा निष्कर्ष एनडीएने काढला आहे. याचाच अर्थ या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर क्रॉस-व्होटिंग झाले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ११ मते अवैध ठरले. एकूण १४ खासदार वेगवेगळ्या कारणांमुळे मतदानात भाग घेऊन शकले नाही. यातील तृणमूल काँग्रेसचे ४, भाजप, काँग्रेस आणि आययूएमएलचे २ आणि राष्ट्रवादी व पीएमकेच्या १-१ खासदार निवडणुकीत सहभागी झाले नाही.