पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन यांची आज सुटका होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारीच यासंदर्भातली घोषणा केली आहे. वाघा बॉर्डरमार्गे त्यांना भारतात आणलं जाईल. बीटिंग द रिट्रीटच्या वेळी अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द केलं जाईल अशी शक्यता आहे. अभिनंदन यांना दुपारपर्यंत आणलं जावं अशी मागणी भारताने केली आहे, मात्र पाकिस्तान बीटिंग द रिट्रीटच्यावेळी अभिनंदन यांना भारतात पाठवलं जाईल अशी शक्यता आहे. वाघा बॉर्डरकडे सगळया देशाचं लक्ष लागलं आहे.

कसा असेल त्यांचा प्रवास?
विंग कमांडर अभिनंदन हे सध्या इस्लामाबादमध्ये आहेत, त्यांना आज विमानाने लाहोरला आणलं जाईल. त्यानंतर वाघा बॉर्डरमार्गे भारताकडे सुपूर्द केलं जाईल. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून त्यांना अमृतसर एअरबेसला आणलं जाईल. तिथून ते दिल्लीला रवाना होतील.

पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी सकाळी भारताच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करत प्रवेश केला होता. भारतीय वायुसेनेनं याचं चोख प्रत्युत्तर दिलं तेव्हा पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला. मात्र या कारवाईत भारताचं मिग २१ हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं. विंग कमांडर अभिनंदन हे विमान चालवत होते. विमान दुर्घटनाग्रस्त होताच पॅराशूटच्या मदतीने ते बाहेर पडले ज्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरमधील एका गावात उतरले. तिथे ही कोणती जागा आहे असे विचारले असता एका नागरिकाने हा भारत आहे अशी खोटी माहिती त्यांना दिली. मात्र वेशभूषेवरून अभिनंदन यांना संशय आला. त्यानंतर त्यांना आपण पाकिस्तानात असल्याचे लक्षात आले. एबीपी माझाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. दरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांची आज सुटका होणार आहे. वाघा बॉर्डरमार्गे ते भारतात परतणार आहेत. ते कधी परतणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे.