News Flash

छत्तीसगडमध्ये २२ जवान शहीद होणं गुप्तचर यंत्रणेचं अपयश?; CRPF प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

२५ ते ३० नक्षलवादी ठार झाल्याची माहिती

Photo: PTI

छत्तीसगडमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत संरक्षण दलांचे २२ जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी घडवलेले हे अलीकडच्या काळातील मोठे हत्याकांड आहे. दरम्यान हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश नसल्याचं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) संचालक कुलदीप सिंह यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमध्ये चकमक झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जवळपास २५ ते ३० नक्षलवादी ठार करण्यात आलेले असून नेमकी संख्या अद्याप हाती आली नसल्याचं सांगितलं.

कुलदीप सिंह यांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “हे गुप्तचर यंत्रणा किंवा ऑपरेशनल अपयश होतं असं बोलण्यात काही अर्थ नाही. जर हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश असतं तर संरक्षण दलाचे जवान ऑपरेशनसाठी गेले नसते. आणि जर हे ऑपरेशनल अपयश असतं तर इतक्या मोठ्या संख्येत नक्षलवादी मारले गेले नसते”.

शहीद जवानांची संख्या २२ वर

“जखमींना आणि मृतदेह नेण्यासाठी नक्षलवाद्यांकडून तीन ट्रॅक्टर वापरण्यात आले. सध्याच्या घडीला किती नक्षलवादी ठार करण्यात आले याची संख्या सांगणं कठीण आहे. पण ही संख्या २५ ते ३० पेक्षा कमी नसावी,” असंही ते म्हणाले आहेत. कुलदीप सिंह यांनी आपण जखमी जवानांची भेट घेणार असल्याची माहिती यावेळी दिली. शहीद झालेल्यांमध्ये सात सीआरपीएफ जवानांचाही समावेश आहे.

चकमकीत शहीद झालेल्या जवानांमध्ये डिस्ट्रिक्ट रिझव्‍‌र्ह गार्ड (डीआरजी)च्या आठ, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकाच्या सात, स्पेशल टास्क फोर्सच्या सहा आणि ‘सीआरपीएफ’च्या ‘बस्तरिया’ बटालियनच्या एका जवानाचा समावेश असल्याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितलं आहे. कोब्रा पथकाचे अनेक जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा जंगलात शोध घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. नक्षलवाद्यांनी नियोजनपूर्वक हा घातपात घडवला, परंतु संरक्षण पथकांचे जवान त्यांच्याशी धैर्याने लढले, असंही त्यांनी सांगितलं. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी सापडले होते.

आणखी वाचा- छत्तीसगड : नक्षलवादी हल्ल्यात २२ जवान शहीद झालेल्या ठिकाणाला भेट देणार केंद्रीय गृहमंत्री

तेकलगुडा गाव आणि परिसरातील छोटय़ा टेकडय़ांवर मोक्याच्या जागांवरून सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. जवानांवर अचानक हल्ला केला. चकमकीच्या ठिकाणी रस्ते, पायवाटा आणि शेतांमध्ये गोळ्यांनी चाळण झालेले जवानांचे मृतदेह आढळले. मृतदेहांवर गोळ्यांबरोबरच धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही आढळल्या, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

नक्षलवाद्यांविरोधात बिजापूर जिल्ह्य़ातील तारेमच्या जंगलात २ एप्रिलला सुरू केलेल्या मोहिमेत शेकडो जवान सहभागी झाले होते. एकाच वेळी बिजापूर जिल्ह्य़ातील तारेम, उसूर, पामेद आणि सुकमा जिल्ह्य़ातील मिनपा आणि नरसापूरम अशा पाच ठिकाणांहून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती, असेही सुंदरराज पी. यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, संरक्षण दलांवरील अनेक घातपाती हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी (पीएजीए) बटालियन १चा म्होरक्या हिदमाबद्दल माहिती गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्याला घेरण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून या हल्ल्याची माहिती घेतली. चकमकीतील जवानांचे बलिदान कायम स्मरणात राहील आणि शांततेच्या शत्रुविरोधातील लढाई यापुढेही सुरू ठेवण्यात येईल, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 9:04 am

Web Title: crpf chief kuldiep singh says no intel failure nearly 30 maoists killed in chhattisgarh operation sgy 87
Next Stories
1 “मास्क घालण्याची गरज नाही, कारण आसाममधून करोना गेला”; भाजपाच्या मंत्र्याचं विधान
2 “हे प्रकरण ईव्हीएमवरचा उरलासुरला विश्वास उडविणारं आणि…”
3 पुतीन यांची लोकप्रियता कायम; रशियामधील ‘सर्वात देखणा पुरुष’ होण्याचा मिळवला मान
Just Now!
X