जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसमुळे भारतातही चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दररोज या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या संसर्गजन्य आजारामुळे आर्थिक प्रगतीलाही मोठी खीळ बसली आहे. करोना व्हायरसचा हा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर केले आहे.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आता समाजातून मदतीचे हात पुढे येत आहेत. नेते, अभिनेते आपल्यापरीने मदतीचा हात पुढे करत असताना, केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफनेही आपले एकदिवसाचे वेतन दिले आहे. सीमेपासून देशाच्या महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे आहे. सीआरपीएफचे अधिकारी आणि जवानांनी ३३ कोटी ८१ लाख रुपयांचा धनादेश पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये जमा केला आहे. करोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात आम्ही देशासोबत ठामपणे उभे आहोत असे सीआरपीएफने म्हटले आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद आणि काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन गडकरी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याची घोषणा केली आहे. तसंच त्यांनी इतरांनाही या परिस्थितीत मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. “मी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचं वेतन पंतप्रधान मदत निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. या महामारीशी लढण्याकरीता मी लोकांना पुढे येण्याचं आणि मदत करण्याचं आवाहन करतो, असं गडकरी म्हणाले.