निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार बीएसएफ जवानाने केल्यानंतर देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानानेही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आणि त्यांच्याकडे मदत मागितली आहे. वरिष्ठांकडून आपला छळ होत आहे. अनेकदा विनंती करूनही आपली बदली थांबवली नाही, अशी तक्रार या जवानाने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

संजीव रंजन सिंह या सीआरपीएफच्या जवानाने राजनाथ सिंह यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. मी अनेकदा माझी बदली करू नका, अशी विनंती केली. पण माझे कुणीही ऐकून घेतले नाही. व्यस्त असल्याने माझ्या घरी जाता आले नाही. त्यामुळे आई, पत्नी आणि मुलांना गमवावे लागले. त्यांच्या आजारपणाच्या काळात मी तेथे नसल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत, असे गंभीर आरोप या जवानाने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. दरम्यान, सीआरपीएफने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संजीव सिंह या जवानाकडून कोणतीही तक्रार आलेली नाही, असे सीआरपीएफचे कमांडर धीरेंद्र वर्मा यांनी स्पष्ट केले आहे, असे ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

बिहारमधील गया जिल्ह्यात सुरुवातीला मी कार्यरत होतो. या जिल्ह्यातच घर होते. मात्र, त्यानंतर तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात बदली करण्यात आली, असे संजीव सिंह या जवानाने पत्रात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षा म्हणून त्याची बदली करण्यात आली होती. कारण २० दिवसांच्या सुट्टीनंतर गेल्या महिन्यात तो वेळेवर कर्तव्यावर आला नव्हता. घरापासून दूर असल्याकारणाने आपली पत्नी, आई आणि मुलाला बघायला जाऊ शकलो नाही. आजारपणात उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले, असे या जवानाने पत्रात म्हटले आहे. यापूर्वी बीएसएफचा जवान तेज बहादूर यादव याने निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार केली होती. फेसबुकवर व्हिडीओ अपलोड करून त्याने आपल्या व्यथा मांडल्या होत्या. जवानांसाठी मिळणारे अन्नधान्य वरिष्ठांकडून विकले जाते, अशी तक्रारही त्याने या व्हिडीओद्वारे केली होती. त्यानंतर देशभरात खळबळ माजली होती.