देशात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. करोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी व करोनाबाधितांची वाढती संख्या अटोक्यात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठीच ‘प्लाझ्मा’ थेरपीचा देखील वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच सीआरपीएफच्या ज्या जवानांनी करोनावर मात केली आहे, अशा जवानांचा प्लाझ्मा करोनाबाधितांसाठी दान करण्यात येत आहे.

इतर करोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ‘प्लाझ्मा’ दान केल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. देशसेवेचा हा आणखी एक मार्ग आहे, असे या जवानांनी म्हटले आहे. आजतागायत सीआरपीएफचे १३९ जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत तिघांनी प्लाझ्मा दान केले आहे व आणखी देखील यासाठी इच्छुक आहेत. अशी माहिती सीआरपीएफच्या ३१ बटालियनचे कमांडंट दिपेंद्र राजपूत यांनी सांगितले आहे.

डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात जी एखाद्या रुग्णाला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. प्लाझ्मा थेरपीमध्ये करोनातून पूर्णपणे बरा झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा करोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते, तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.