पुलवामा येथे २५०० सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा देशात सर्वच स्तरातून निषेध होत आहे, अनेक चर्चाही झडत आहेत. यामध्ये सीआरपीएफकडूनही काहीतरी चूक झाली असावी असे निष्कर्ष काढले जात आहेत. मात्र, याबाबत आता एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. सीआरपीएफने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे जवानांना घेऊन जाण्यासाठी हवाई प्रवासाची मागणी केली होती मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे वृत्त ‘द क्विंट’ने नाव न सांगता सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अधिकाऱ्याने सांगितले की, काश्मीर खोऱ्यात गेल्या पंधरा दिवसांत सुरु असलेल्या मोठ्या बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने सीआरपीएफचे शेकडो जवान येथे अडकून पडले होते. त्यातच जवानांचा एक जत्था ४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर बाहेर पडला होता. काश्मीर खोऱ्यातून प्रवास करणे हे मोठे जोखमीचे काम असल्याने आम्ही कायम आमच्या सुरक्षेबाबत अलर्ट असतो. मात्र, बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्यामुळे अडचण येत असल्याने आमच्या जवानांना विमानांद्वारे इथून बाहेर काढण्यात यावे, अशी विनंती आम्ही सीआरपीएफच्या मुख्यालयाकडे केली होती. आमची ही सूचना नियमानुसार केंद्रीय गृहखात्याकडे पाठवण्यात आली. मात्र, यावर काहीही घडले नाही, कोणीही याला गांभीर्याने घेतले नाही.

विमानाद्वारे जवानांना घेऊन जाणे हे केवळ सुरक्षित नव्हे तर वेळेची बचत करणारे आणि कमी खर्चिक होते. त्यामुळे पुन्हा एकदा आठवड्याभरापूर्वीच गृहखात्याकडे जवानांना विमानांद्वारे नेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, त्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी ८ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या उच्चाधिकाऱ्यांना एक पत्र लिहून हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. या भागात कसून चौकशी करा, कारण काश्मीर खोऱ्यात आयईडीद्वारे स्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. मात्र, यालाही गांभीर्याने घेतले गेले नाही.

खोऱ्यात यापूर्वी सीआरपीएफच्या अशाच जत्थ्यांचे नेतृत्व करणारे सीआरपीएफचे निवृत्त पोलीस महानिरिक्षक व्ही. पी. एस. पनवार म्हणाले, पुलवामात झालेला हल्ला म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचे अपयश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या माहितीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असा आरोपही त्यांनी केला.

एकाच वेळी शेकडो जवानांचा जत्था निघालेला असताना त्यांना बुलेटप्रुफ वाहनं किंवा विमानं उपलब्ध करुन देणं गरजेचे होतं. तसेच जत्थ्यामधून ७८ वाहनं जात असणं दहशतवाद्यांसाठी हे एखादा बदकांचा जत्था निघाल्याप्रमाणे होतं. इतक्या मोठ्या प्रमाणावर जवानांना एकत्र जाऊ देणं हा निर्णयही योग्य नव्हता, असेही पनवार यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crpf wanted air transit for attacked convoy but it was ignored by mha
First published on: 17-02-2019 at 16:41 IST