केंद्रीय राखीव पोलीस दलातील एका महिला कुस्तीपटूने संघाचे प्रशिक्षक सुरजीत सिंह आणि मुख्य क्रीडा अधिकारी खाजन सिंह यांच्यावर बलात्काराचा, लैंगिक छळाचा आणि दहशत निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूने निमलष्करी दलाकडून खेळताना अनेक पदके जिंकली आहेत.

“संघाचे प्रशिक्षक आणि मुख्य क्रीडा अधिकारी सीआरपीएफमध्ये सेक्स स्कँडल चालवतात. त्यांचे अनेक साथीदार आहेत. महिला कॉन्स्टेबल्सचा ते लैंगिक छळ करतात आणि नंतर त्यांचा साथीदार म्हणून वापर करतात” असे तक्रारीत म्हटले आहे. बाबा हरीदास नगर पोलीस ठाण्यात तीन डिसेंबर रोजी पीडित महिलेने दोघांविरोधात FIR नोंदवला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आल्याचे सीआरपीएफने अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. “सीआरपीएफने या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस महानिरीक्षक स्तराच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आमच्याकडून तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्यात येईल” असे सीआरपीएफचे प्रवक्त एम. धिनाकरन यांनी सांगितले.

एफआयआरनुसार, पीडित महिला कुस्तीपटूचा अनेक वर्ष लैंगिक छळ करण्यात आला. २०१२ साली वरिष्ठ कुस्ती संघामध्ये दाखल झाली. तेव्हापासून संघाचे प्रशिक्षक सुरजीत सिंह माझा आणि अन्य मुलींचा लैंगिक छळ करत आहेत असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांनी अयोग्य पद्धतीने स्पर्श केला असा आरोप महिला कुस्तीपटूने केला आहे.