News Flash

ट्विटरमधील शक्तिशाली ‘विजया’!

ट्रम्प यांचे खाते बंद करण्यात भारतीय वंशाच्या महिलेची निर्णायक भूमिका

(संग्रहित छायाचित्र)

 

 

ज्यांच्या चिथावणीमुळे त्यांच्या समर्थकांनी अमेरिकी संसदेवर हल्ला केला ते मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावर ‘नजर’ ठेवून ते कायमचे बंद करण्यापर्यंतच्या निर्णयप्रक्रियेत एका भारतीय वंशाच्या मराठी अधिकारी महिलेने प्रमुख भूमिका बजावली. विजया गडदे असे त्यांचे नाव.

विजया गडदे ट्विटरच्या वरिष्ठ कायदा अधिकारी आहेत. कंपनीची धोरणे, कायदेविषयक बाबी, संस्थेची विश्वासार्हता आणि सुरक्षितता इत्यादी मुद्दय़ांशी निगडित प्रश्न सोडवण्याची जबाबदारी विजया यांच्यावर आहे.

कॅपिटॉल हिल हल्ल्यानंतर समाज संदेशवहनात जगव्यापी असलेल्या अमेरिकास्थित ट्विटर या तंत्रज्ञान कंपनीने गेल्या शुक्रवारी अध्यक्ष ट्रम्प यांचे खाते कायमचे बंद केले. त्याबद्दल गडदे म्हणाल्या, ‘‘अध्यक्षांचे खाते सुरू ठेवले असते तर आणखी हिंसाचाराची जोखीम उचलावी लागली असती. आम्ही आमच्या धोरणात्मक कारवाईचे विश्लेषण प्रसिद्ध केले आहे. तुम्ही तो सविस्तर निर्णय वाचू शकता.’’

अमेरिकेत आज आघाडीच्या वृत्तमाध्यमांमध्ये विजया यांच्या नावाचा बोलबाला आहे, नव्हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द पॉलिटिको’ या वृत्तपत्राने, ‘‘ज्यांच्याविषयी तुम्ही कधीच ऐकले नाही, अशा सर्वात शक्तिशाली समाजमाध्यम अधिकारी’’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला आहे. ‘इन्स्टाइल’ या महिला नियतकालिकाने विजया यांचा समावेश जग बदलण्यासाठी कार्यरत असलेल्या २०२० च्या सर्वात प्रभावी व्यक्तींमध्ये केला आहे.

विजया यांचे वडील मेक्सिकोच्या आखातातील एका तेल कंपनीत अभियंता होते. त्यामुळे गडदे कुटुंबाला अमेरिकेत टेक्सासमध्ये स्थलांतरित व्हावे लागले. विजया त्या वेळी शाळकरी वयाच्या होत्या. टेक्सासमध्येच त्या वाढल्या. त्यानंतर त्यांचे कुटुंब न्यू जर्सीला स्थलांतरित झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण तेथेच पूर्ण केले. कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आणि न्यू यॉर्क विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. २०११मध्ये ट्विटरमध्ये दाखल होण्याआधी त्यांनी एका नव्या तंत्रज्ञान कंपनीत दहा वर्षे काम केले.

‘फॉर्च्यून’ या व्यापारविषयक नियतकालिकात एक वृत्तांत प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार ट्विटरचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी गेल्या वर्षी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली तेव्हाही विजया त्यांच्याबरोबर होत्या. त्यानंतर डोर्सी यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हाही विजया त्यांच्या सोबत होत्या.

डोर्सी यांनी बौद्ध धर्मगुरूदलाई लामा यांच्याबरोबरचे भारत दौऱ्याचे एक छायाचित्र प्रसारित केले होते. त्यात डोर्सी आणि दलाई लामा या दोघांच्या मध्ये दलाई लामांचा हात हातात घेऊन विजयाही होत्या.

महिलांसाठीही कार्य

ट्विटरव्यतिरिक्त विजया गडदे ‘एंजल्स’ या गुंतवणूक मार्गदर्शन संस्थेच्या संस्थापक आहेत. ही संस्था नवउद्यमींना साथ देते आणि मोठय़ा कंपन्यांमधील महिलांना समान नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी मदत करते.

ट्विटरच्या प्रतिष्ठेसाठी प्रभावी कामगिरी

कंपनीच्या वकील म्हणून कंपनीची ध्येये आणि उद्दिष्टांना पूरक धोरणे आखणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी. गेल्या दशकभरात विजया यांच्या प्रभावी कामगिरीमुळे ट्विटरची प्रतिष्ठा वाढली. जागतिक राजकारणात ट्विटरची भूमिका वाढत गेली आणि विजया हे नावही प्रकाशझोतात येऊ लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 12:45 am

Web Title: crucial role of a woman of indian descent in closing trump account abn 97
Next Stories
1 लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च केंद्रातर्फे
2 केंद्राची कानउघाडणी!
3 भारतीय महिला वैमानिकांचा विक्रम
Just Now!
X