येथे भाजप कार्यालयावर मध्यवस्तीच्या ठिकाणी क्रूड बॉम्ब फेकण्यात आला.  या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.

माकप कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले असावे असा आरोप भाजपने केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष कुमम्मम राजशेखर हे येथून कोझीकोड येथील कार्यालयात जाण्यासाठी निघाले असताना हा हल्ला करण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २३ सप्टेंबरपासून तीन दिवस तेथे होणार असल्याने पाहणीसाठी ते गेले होते. हा स्फोट झाला तेव्हा इमारतीत चार कामगार छपरावर काम करीत होते. यात कुणी जखमी झाले नसले तरी प्रवेशद्वाराच्या काचा फुटल्या आहेत, असे तिरुअनंतपूरमचे पोलीस आयुक्त एस. स्पर्जन कुमार यांनी सांगितले. माकप व भाजप यांच्यात कन्नूर जिल्हय़ात चकमकी सुरू असून त्यानंतर आता हा प्रकार घडला आहे. राजशेखरन यांनी असा आरोप केला, की माकपने कायदा हातात घेतला असून, पोलीस मूक प्रेक्षक बनले आहेत. माकपचा हिंसाचार वाढत आहे. कन्नूर येथे एका भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. माकप नेते व मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी त्यांच्याकडे गृह खाते असतानाही या घटनेचा निषेध केलेला नाही. भाजप नेते पी. के. कृष्णदास व एम. टी. रमेश यांनी माकपवर टीका करताना म्हटले आहे, की पक्ष कार्यालयावर झालेला हल्ला एकमेव नाही. हा नियोजित हल्ला होता व त्यात माकपचा हात आहे. कार्यालयासमोरील फ्लेक्स बोर्डची नासधूस करण्यात आली आहे. सीसीटीव्हीत एक व्यक्ती स्फोटापूर्वी मोटारसायकलवरून जाताना दिसत असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.