स्थलांतरित कामगारांसाठी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यावरून काँग्रेस आणि भाजपात उत्तर प्रदेशात राजकारण सुरू आहे. या राजकारणाला आता नवं वळण लागलं आहे. काँग्रेसच्या एका महिला आमदारानं आता याच राजकारणावरून आपल्या पक्षालाच धारेवर धरलं आहे. त्यांनी थेट प्रियांका गांधी यांच्यावरच टीका केली आहे.

आदिती सिंह असं या महिला आमदाराचं नाव आहे. त्या रायबरेलीतील बंडखोर काँग्रेस आमदार आहेत. त्यांनी टि्वट केलंय की, “संकटाच्या या काळात खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याची गरजच काय? ज्या एक हजार बसेसची यादी पाठवण्यात आली त्यातील अर्ध्याहून अधिक बसेसची नोंदणीच बनावट आहे. २९७ बसेस भंगार आहेत. ९८ ऑटो रिक्षा आणि अॅम्ब्युलन्ससारख्या गाड्या आहेत. ६८ गाड्या अशा आहेत, ज्यांना कोणतेही परवान्याचे कागदपत्रच नाहीत. ही क्रूर थट्टा आहे. बस होत्या तर त्या राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रातही का नाही सुरू केल्या.?”

आणखी वाचा- बसवर भाजपाचे झेंडे लावा पण कामगारांना घरी आणण्याची परवानगी द्या ! प्रियंका गांधींची योगी आदित्यनाथ यांना विनंती

आदिती सिंह अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत आहेत. गेल्या वर्षी मात्र त्यांनी पक्षादेशाचे पालन केले नव्हते. व्हिप असतानाही त्या विधानसभेत हजर झाल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. काश्मीरच्या मुद्द्यावरूनही आदिती यांनी काँग्रेसच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका मांडली होती.

मुख्यमंत्री योगी यांची केली प्रशंसा
कोटामध्ये जेव्हा यूपीचे हजारो विद्यार्थी अडकले होते तेव्हा या हजार बसेस कुठे होत्या. काँग्रेस सरकार या विद्यार्थ्यांना घरापर्यंतच काय सीमेवरही सोडू शकलं नाही. उलट योगी आदित्यनाथ यांनी रात्रीतून या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवलं. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीही यासाठी कौतुक केलं होतं, अशा शब्दांत आदिती सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा केली.