नवी दिल्ली : देशातील कोविड-१९ विषयक परिस्थिती गंभीर झालेली असतानाच, प्राणवायूच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणारे चार क्रायोजेनिक कंटेनर भारतीय हवाई दलाने शनिवारी सिंगापूरहून भारतात आणल्या.

क्रायोजेनिक ऑक्सिजनचे चार कंटेनर घेऊन अवजड वाहतूक करणारे भारतीय हवाई दलाचे एक सी-१७ विमान सिंगापूरच्या चांगी विमानतळावरून निघाले आणि दुपारी साडेचारच्या सुमारास पश्चिम बंगालमधील पानागड हवाई तळावर उतरले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोविड- १९ च्या रुग्णांवरील उपचारासाठी अतिशय आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्राणवायूच्या वितरणाची गती वाढवण्यासाठी भारतीय वायुदल शुक्रवारपासून हवाई मार्गाने रिकाम्या ऑक्सिजन टाक्या व कंटेनर हवाई मार्गाने देशभरातील निरनिराळ्या भरणा केंद्रांवर (फिलिंग स्टेशन्स) पोहचवत आहे.

प्राणवायू एक्स्प्रेस       उत्तर प्रदेशात दाखल

लखनऊ : ऑक्सिजनचे तीन टँकर घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस  उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी दाखल झाली. द्रव ऑक्सिजनचे टँकर वाहून नेण्यासाठी या गाड्यांचा वापर केला जात आहे.   सकाळी  लखनऊ येथे वैद्यकीय ऑक्सिजनचे दोन ट्रक दाखल झाले असून ते वाराणसी येथे उतरवण्यात आले, असे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी सांगितले.