News Flash

भरपूर प्रथिने असलेली कोंबडय़ांची रोगमुक्त प्रजाती विकसित

कोंबडय़ा जेव्हा कुक्कुटपालन संस्था पाळत असतात, तेव्हा त्यांना प्रतिजैविके खाऊ घातली जातात

नानाजी देशमुख पशु विद्यापीठाचे संशोधन

मध्य प्रदेशातील पशुवैद्यकीय विद्यापीठाने कोंबडीची रोगमुक्त प्रजाती तयार केली आहे व या कोंबडय़ा आता अधिक स्वस्त दरात उपलब्ध केल्या जातील. कोंबडय़ा जेव्हा कुक्कुटपालन संस्था पाळत असतात, तेव्हा त्यांना प्रतिजैविके खाऊ घातली जातात, त्यामुळे अशा कोंबडय़ा सेवन केल्याने मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो पण या कोंबडय़ांना रोग होत नसल्याने कुठल्या कृत्रिम औषधांचा वापर त्यांच्यात करावा लागणार नाही. जबलपूर येथील नानाजी देशमुख पशुविज्ञान विद्यापीठाने कोंबडीची जी नवी प्रजाती तयार केली आहे, तिचे नाव ‘नर्मदा निधी’ असे असल्याचे विद्यापीठातील प्राध्यापक ओ.पी.श्रीवास्तव यांनी सांगितले.
प्रथिनांनी परिपूर्ण असलेल्या कोंबडय़ामध्ये ‘कडकनाथ’ व ‘जबलपूर कलर’ या कोंबडय़ांच्या प्रजातीच्या जनुकांचा समावेश करून या नवीन कोंबडय़ाची निर्मिती करण्यात आली आहे. कडकनाथ ही आदिवासी बहुल झाबुआ व अलिराजूर या मध्य प्रदेशातील भागात असलेली कोंबडय़ांची प्रजाती आहे. जबलपूर कलर ही प्रजाती विद्यापीठानेच या कोंबडय़ांपासून तयार केलेली आहे व आता नर्मदा निधी ही नवी प्रजाती तयार करण्यात आली असून या कोंबडय़ा स्वस्त व अधिक पौष्टिक आहेत. ग्रामीण भागातील गरीब लोकांकरिता कोंबडय़ांची ही प्रजाती विकसित केली आहे. ती ग्रामीण भागात घरातील खरकटय़ा अन्नावर वाढू शकते व या कोंबडय़ांना रोग होत नाहीत, त्यांना परदेशी कोंबडय़ांप्रमाणे लशी द्याव्या लागत नाहीत. डाळींचे भाव वाढल्यानंतर गरिबांना अन्नातून प्रथिने मिळावीत, यासाठी ही कोंबडीची प्रजाती उपयोगी आहे. आपल्या साध्या देशी कोंबडय़ा ४९ अंडी देतात तर नर्मदा निधी ही कोंबडी १८१ अंडी देते. यातील एक अंडे ४ रुपयांना पडते, एरवी एक अंडे सहा रुपयांना मिळते, या कोंबडीचे मांस किलोला ८०-९० रुपये दराने मिळेल. सध्या चिकनचा भाव १२० रुपये किलो आहे. या कोंबडीची चव देशी कोंबडीसारखीच असून तिला बाजारात चांगली किंमत येईल, असे प्राध्यापक श्रीवास्तव यांचे मत आहे. विशेष करून गरीब वर्गात या कोंबडय़ा वरदान ठरणार आहेत. लवकरच या प्रजातीच्या ३५ कोंबडय़ा आदिवासी कुटुंबांना एक कार्यक्रम आयोजित करून वितरित केल्या जाणार आहेत.

नर्मदा निधी
अंडय़ांची संख्या -१८१ (इतर कोंबडय़ा -४९)
अंडय़ाची किंमत- ४ रु. प्रतिनग (इतर कोंबडय़ा ६ रु. नग)
चिकनची किंमत- ८०-९० रुपये (इतर कोंबडय़ांचे चिकन १२० रु. किलो)
डाळीला पर्याय- गरीब लोकांना डाळ परवडत नाही त्यामुळे प्रथिनांसाठी या कोंबडय़ा उपयुक्त
रोगमुक्त- या कोंबडय़ांना लसी व प्रतिजैविके द्यावी लागत नाहीत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2015 12:59 am

Web Title: cure chicken develop by nanaji deshmukh veterinary
Next Stories
1 अमेरिकेच्या युद्धनौकेमुळे चीनच्या नौदलप्रमुखांना चिंता
2 नरेंद्र मोदी यांचा नितीशकुमारांना सवाल
3 संता-बंताच्या विनोदांवर बंदी घाला, सर्वोच्च न्यायालयात याचिका
Just Now!
X