५८ वर्षांची एक महिलेचा करोना अहवाल १४ जून रोजी पॉझिटिव्ह आला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर ही महिला बरीही झाली. मंगळवारी म्हणजेच ३० जून रोजी तिला डिस्चार्ज मिळाला. मात्र तिने तास न् तास वाट पाहिली, तिला घरी न्यायला कुणी आलंच नाही. घरातल्यांची वाट पाहून पाहून ती थकली.. मात्र तिला कुणीही न्यायला आलं नाही. अखेर रुग्णालयाने तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं आहे. हैदराबादमधल्या खैरताबादमधली ही घटना आहे. या महिलेला गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती बरी झाली पण तिला न्यायला कुणी आलंच नाही.

“आम्ही या महिलेच्या कुटुंबीयांना फोन केला. त्यावेळी एकाने आम्हाला विचारलं की ही महिला खरंच बरी झाली आहे का? आम्ही त्या व्यक्तीला सांगितलं की या महिलेची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली की कदाचित ती महिला पूर्णपणे बरी झाली नसेल. त्यानंतर त्या व्यक्तीने फोन ठेवून दिला. त्यानंतर आमचा एकही फोन त्यांनी घेतला नाही” अशी माहिती डॉ. प्रभाकर रेड्डी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

प्रभाकर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही एकच महिला अशी नाही जी करोनामुक्त होऊन तिला कुणी घ्यायला आलं नाही. गांधी रुग्णालयात सध्याच्या घडीला असे ३५ रुग्ण आहेत ज्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना फोन कॉल किंवा व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत मात्र आमच्या फोन किंवा व्हिडीओ कॉल्सना उत्तरच दिले जात नाही.

काही घटनांमध्ये लोक आम्हाला सांगत आहेत की आमच्या घरी लहान मुलं आहेत तेव्हा बरं झालेल्या रुग्णाला घेऊन जाण्याची जोखीम आम्ही पत्करु शकत नाही. अनेकांनी लहान मुलं घरी आहेत असंच कारण दिलं आहे, अशी माहितीही रेड्डी यांनी दिली.

काही लोक सांगतात आमच्या घरी एकच बाथरुम आहे. अशात लहान मुलं घरात असताना आम्ही बरे झालेल्या रुग्णांना वेगळं कसं ठेवू? असाही प्रश्न काही लोक विचारत आहेत. अनेकदा बरे झालेल्या रुग्णांशी त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय फोनवरुन व्हिडीओ कॉलद्वारे चौकशी करतात. मात्र जेव्हा आम्ही सांगतो की रुग्णाला लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे तेव्हा अचानक हे फोन आणि व्हिडीओ कॉल्स बंद होतात. त्यानंतर या रुग्णांना कुणीही न्यायला येत नाही. करोना हा या लोकांसाठी बदनामीचा विषय झाला आहे. शेजारी-पाजारी काय म्हणतील? लोक काय म्हणतील हा प्रश्नही लोक आम्हाला विचारतात असंही डॉक्टर रेड्डी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.