राजस्थानच्या करौली जिल्ह्य़ातील हिंदौन येथे दलित वस्तीवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या सवर्णाच्या जमावाने दोन नेत्यांची घरे पेटवून दिल्याची घटना मंगळवारी घडली होती. अशाच घटना घडल्यास आम्ही धर्म बदलून इस्लामचा स्वीकार करू, असा इशारा या समाजातील काही लोकांकडून देण्यात येत आहे.

‘त्या’ लोकांनी मारहाण करण्यापूर्वी आम्ही दलित असल्याची खात्री करून घेण्यासाठी आमची ओळखपत्रे तपासली. ते सर्व जण उच्चवर्णीय होते आणि त्यांनी महिलांनाही सोडले नाही, असे सांगणाऱ्या अश्विन जाटव याने त्याचा शर्ट काढून पाठीवरील वळ दाखवले. दलित व आदिवासी संघटनांच्या ‘भारत बंद’मुळे भडकलेल्या जमावाने आमदार राजकुमारी जाटव आणि भरोसीलाल जाटव यांची घरे पेटवली होती.

संचारबंदीत पाच तासांची सूट

जयपूर : राजस्थानच्या हिंदौन शहरात लागू करण्यात आलेली संचारबंदी बुधवारी पाच तासांसाठी शिथिल करण्यात आली होती. हिंदौनमधील परिस्थिती नियंत्रणात असून अद्याप कुठलीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली, असे करौलीचे जिल्हाधिकारी अभिमन्यू कुमार यांनी सांगितले.