News Flash

मंगळावर सापडले पाण्याचे पुरावे

नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीला लाल रंगाच्या मंगळ ग्रहावर पाण्याचे पुरावे सापडले आहेत. तेथील मातीच्या नमुन्याचे गाडीवर असलेल्या प्रयोगशाळेत परीक्षण केले

| September 28, 2013 12:51 pm

नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीला लाल रंगाच्या मंगळ ग्रहावर पाण्याचे पुरावे सापडले आहेत. तेथील मातीच्या नमुन्याचे गाडीवर असलेल्या प्रयोगशाळेत परीक्षण केले असता त्यातील बऱ्याच घटकांत पाण्याचे वजन मोठय़ा प्रमाणावर असल्याचे दिसून आले आहे. त्या मातीचे नमुने तापवले असता त्यातून कार्बन डाय ऑक्साईड, सल्फर संयुगे ऑक्सिजन असे अनेक घटक दिसून आले. रेनसेलीयर पॉलिटेक्निक येथील स्कूल ऑफ सायन्स या संस्थेच्या अधिष्ठाता लॉरी लेशिन यांनी सांगितले, की क्युरिऑसिटी रोव्हर गाडीने गोळा केलेल्या पहिल्याच नमुन्यात अनेक वैशिष्टय़े सामोरी आली आहेत. मंगळावरील मातीचा दोन टक्के भाग हा पाण्याचा बनलेला असून, त्यामुळे वैज्ञानिकदृष्टय़ा ही माहिती उत्कंठावर्धक मानली जात आहे.
क्युरिऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळावरील गेल विवरात ६ ऑगस्ट २०१२ रोजी उतरली असून, मंगळावर जीवसृष्टीस अनुकूलता आहे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधणे हाच त्याचा प्रमुख हेतू आहे. रोव्हर गाडीवर सॅम्पल अ‍ॅनलिसिस अँट मार्स (सॅम) नावाचे उपकरण असून त्यात गॅस क्रोमॅटोग्राफ, मास स्पेक्ट्रोमीटर व टनेबल लेसर स्पेक्ट्रोमीटर यांचा समावेश आहे.
 सॅममधील या उपकरणांमुळे अनेक रासायनिक संयुगांचे, किरणोत्सारी समस्थानिकांचे परीक्षण करता येते. सॅम प्रकल्पाचे प्रमुख संशोधक पॉल महाफी यांनी सांगितले, की सॅमची माहिती इतर मार्गानी प्राप्त झालेल्या खनिज, रासायनिक माहितीशी ताडून पाहिली जाईल. या अभ्यासात एकूण मंगळ विज्ञान प्रयोगशाळेतील ३४ वैज्ञानिक काम करीत आहेत.

मंगळावरील माती परीक्षण
रोव्हर गाडीवरील स्कूपच्या मदतीने धूळ व रॉकनेस्ट भागातील अतिशय बारीक माती गोळा करण्यात आली आहे. स्कूपमधून गोळा केलेली माती ८३५ सेल्सियस अंश तापमानाला गरम करण्यात आली. त्यातून या नमुन्यात क्लोरिन व ऑक्सिजन असल्याचेही दिसून आले आहे.  मंगळाच्या विषुववृत्तावरील भागात क्युरिऑसिटी रोव्हरला अशाप्रकारे काबरेनेट संवर्गातील संयुगे सापडली असून, ती पाण्याच्या अस्तित्वाशिवाय तयार होऊ शकत नाहीत. सॅम यंत्राने हायड्रोजन व कार्बन यांच्या समस्थानिकांचे पाणी व कार्बन डाय ऑक्साईडमधील प्रमाणाचे गुणोत्तर प्रमाण काढण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 12:51 pm

Web Title: curiosity discovers water on mars
टॅग : Mars
Next Stories
1 जावडेकरांसह तिघांची सीबीआयकडून कथित व्हिडिओ टेपप्रकरणी चौकशी
2 पाकिस्तानी न्यायालयाने ‘आयएसआय’च्या कार्यपद्धतीची माहिती मागविली
3 भारतातील अनेक शहरांमध्ये बांगलादेशची ‘बिमान सेवा’
Just Now!
X