ब्रिटन आणि दक्षिण अफ्रिकेत करोना विषाणूचे नवे प्रकार आढळून आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. एकीकडे युद्धपातळीवर लस निर्मिती प्रक्रिया सुरु असतानाच हे नवे विषाणू आढळल्याने जगाच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र, या नव्या विषाणूंवरही लस प्रभावी ठरतील असा विश्वास भारताचे प्रधान वैज्ञानिक सल्लगार प्रा. के. विजय राघवन यांनी व्यक्त केला आहे.

प्रा. राघवन म्हणाले, “करोना प्रतिबंधक लस ब्रिटन आणि दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या विषाणूविरोधातही काम करेल. सध्याची लस करोनाच्या या नव्या विषाणूंपासून वाचवण्यास अपयशी ठरतील याचा कुठलाही पुरावा नाही.” तर दुसरीकडे, आयसीएमआरचे महासंचालक म्हणाले, “आपण विषाणूवर खूपच अधिक प्रमाणात रोगप्रतिकार दबाव टाकता कामा नये. आपल्याला अशा थेरपीचा प्रयोग करायला हवा जी आपल्याला फायदा मिळवून देईन. जर यामुळे फायदा होत नसेल तर आपण त्या उपचारांचा उपयोग करता कामा नये, अन्यथा या उपचारामुळे विषाणूवर अधिक दबाव आल्याने विषाणूचे उत्परिवर्तन घडून येईल”

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, “ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू सापडल्याची बातमी येण्याआगोदरच आम्ही प्रयोगशाळेत सुमारे ५,००० जिनोम विकसित केले होते. आता या संख्येत आपण अधिक वाढ करु.” तर केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले, “INSACOG या गटाची स्थापना करण्यात आली आहे. देशातील १० सरकारी प्रयोगशाळांचा हा एक संघ आहे. हा संघ करोनाच्या जिनोमचा अनुक्रमांसह त्या विषाणूच्या कोणत्याही प्रकाराचा अनुक्रम लावतो. या प्रयोगशाळा आयसीएमआर, बायोटेक इंडिया, सीएसआयआरशी संबंधित आहेत.

देशातील सक्रिय रुग्णांचे ६० टक्क्यांहून अधिक भाग पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत. यांपैकी सुमारे २४ टक्के प्रकरणं केरळमध्ये, २१ टक्के महाराष्ट्रात, ५ टक्क्यांहून अधिक पश्चिम बंगाल, ५ टक्के उत्तर प्रदेशात तर ४.८३ टक्के प्रकरणं छत्तीसगडमध्ये आढळून आली आहेत.