करोनाने अमेरिकेमध्ये थैमान घातलं आहे. येथे दोन लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर तीन हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक शहरांमधील दुकाने, हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल अशी ठिकाणे बंद करण्यात आली आहे. मात्र या सर्वांमध्ये फ्लोरिडामधून एक आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे. लॉकडाउनच्या आदल्या दिवशी येथील एका हॉटेलमध्ये एका गिऱ्हाईकाने चक्क १० हजार डॉलर म्हणजेच साडेसात लाख रुपयांची टीप ठेवली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये हे पैसे वाटून घेण्यात यावं असंही या गिऱ्हाईकाने म्हटलं होतं, अशी माहिती हॉटेल मालकाने दिली आहे.

फ्लोरिडामधील नॅप्लिज येथील स्केलेट्स हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. हॉटेलचा मालक रॉस एडलॅण्ड याने यासंदर्भात हॉटेलच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. ‘जगामध्ये भन्नाट लोकं आजही आहेत, यावर विश्वास बसणारी ही घटना आहे,’ असं हॉटेल मालकाने म्हटलं आहे.

“आमचं स्केलेट्सचं कुटुंब मोठं आहे. यामध्ये येथे येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गिऱ्हाईकांचाही समावेश होतो. अशाप्रकारची माणुसकी दाखवणाऱ्या समाजाचा आणि कुटुंबाचा आम्ही भाग आहोत याचा आम्हाला आनंद आहे,” असं रॉस म्हणतो. नेपल्स डेली न्यूज या स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोजने हे पैसे त्या गिऱ्हाईकाने आमच्या मॅनेजरच्या टेबलवर ठेवले आणि तो निघून गेला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेथे शटडाउनचे आदेश देण्यात आल्याने सर्व हॉटेल्स बंद करण्यात आली. ‘ही व्यक्ती कोण होती आम्हाला ठाऊक नाही. आम्ही अद्याप तिचा शोध घेत आहोत. आमच्याकडे नेहमी येणाऱ्या ग्राहकांची संख्या बरीच आहे. त्यापैकी अनेकजण आता आम्हाला ओळखू लागले आहेत मात्र आम्हाला त्यांची नाव माहिती नाही. आम्ही अनेकांना चेहऱ्याने ओखळतो, आम्हाला ते काय ऑर्डर देणार आहेत, त्यांना कोणत्या टेबलवर बसायला आवडतं हे सर्व ठाऊक आहे. मात्र त्यांच्याबद्दलची खासगी माहिती आम्हाला नाही. कदाचित ही व्यक्ती त्यापैकीच कोणीतरी असू शकेल,’ असं अंदाज रॉसने व्यक्त केला आहे.

या दहा हजार डॉलरचे हॉटेलमधील २० कर्मचाऱ्यांमध्ये समान वाटप करण्यात आलं आहे. प्रत्येकाच्या वाट्याला ५०० डॉलर म्हणजेच अंदाजे ३७ हजार रुपये आले.