देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून वैद्यकीय प्राणवायुअभावी अनेकांना प्राण गमवावे लागल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शनिवारी तातडीने पावले उचलत कोविड-१९ लस, वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे यांचा पुरेसा साठा अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी या घटकांना आयातीच्या मूलभूत सीमाशुल्कातून सूट जाहीर केली.

देशातील प्राणवायूच्या पुरवठ्यास अधिकाधिक चालना कशी देता येईल या बाबत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

प्राणवायूचे उत्पादन आणि उपलब्धता वाढवून त्याच्या वाढत्या मागणीची पूर्तता करता येणे शक्य व्हावे यासाठी या घटकांना आयातीच्या मूलभूत सीमाशुल्कातून आणि आरोग्य करातून तीन महिन्यांसाठी पूर्ण सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय त्वरित लागू केला जाणार आहे, असे एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे कोविड-१९ लशींच्या आयातीवरील मूलभूत सीमाशुल्कातही तीन महिन्यांसाठी सवलत देण्यात येणार आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्टे्रटरसह फ्लो मीटर, रेग्युलेटर, कनेक्टर्स आणि ट्युबिंग, ऑक्सिजन कॅनिस्टर, र्फिंलग सिस्टिम, स्टोअरेज टँक्स आणि क्रायोजेनिक सिलिंडर्स आणि टँकसह सिलिंडर्स हे प्राणवायूशी संबंधित १६ घटक आणि उपकरणे यांच्यावरील सीमाशुल्क माफ करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे व्हेण्टिलेटर्स (नेझल कॅन्युलासह), नॉन इन्व्हेझिव्ह व्हेण्टिलेटर्ससह वापर करण्यात येणारी हेल्मेट्स, नॉन इन्व्हेझिव्ह व्हेण्टिलेशन ओरोनेझल आणि आयसीयू व्हेण्टिलेटर्ससाठीचे नेझल मास्क यांनाही आयात शुल्कातून आणि आरोग्य करातून सवलत देण्यात आली आहे. यामुळे या घटकांच्या उपलब्धतेला चालना मिळेल आणि त्यांच्या दरातही कपात होणार आहे.

अशा प्रकारच्या उपकरणांना अखंड आणि तातडीने सीमाशुल्क सवलत मंजुरी मिळेल याची खातरजमा करण्याचे आदेश मोदी यांनी महसूल विभागाला दिले आहेत. सरकारकडून सध्या परदेशातून येणाऱ्या लशींवर १० टक्के सीमाशुल्क अथवा आयात कर लावण्यात येतो. सवलत देण्यात आल्याने परदेशातून येणाऱ्या लशींचे दर कमी होण्यास मदत होणार आहे.