लॉकडाउनमध्ये सुरू असलेल्या कोविड स्पेशल ट्रेनमधून चक्क सिगारेटच्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या कस्टम विभागाने ४० लाख रुपये किंमतीच्या सिगारेट जप्त केल्या आहेत. जुनी दिल्ली स्टेशनवर कस्टम विभागाने ही कारवाई केली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, कस्टम विभागाने ‘पॅरिस’ ब्रँडच्या ४.५ लाख सिगारेट जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या सर्व सिगारेटची एकूण किंमत जवळपास ४० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. बांगलादेशमधून या सिगारेट आणल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लॉकडाउनमध्ये हावडाहून अमृतसरमार्गे दिल्ली धावणाऱ्या स्पेशल ट्रेनच्या माल डब्ब्यामधून या सिगारेट जप्त केल्याचं अधिकाऱ्यांनी बुधवारी(दि.८) सांगितलं.
बांगलादेशमध्ये तयार झालेल्या या सिगारेट हावडा येथे ट्रेनच्या डब्ब्यात ठेवल्याची शंका यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अद्याप याप्रकऱणी कोणालाही अटक झालेली नाही. याबाबत अधिक तपास सुरू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 1:47 pm