* अडीच लाख पासवर्ड चोरीस
* संशयाची सुई चीनकडे
ट्विटर या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग व मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळावर अतिशय अत्याधुनिक तंत्राचा वापर करून सायबर हल्ला करण्यात आल्याचे समजते. एकूण अडीच लाख लोकांचे पासवर्ड चोरले गेले आहेत. असाच सायबर हल्ला काही पाश्चिमात्य वृत्तसंकेतस्थळांवर अलिकडेच झाला होता तशाच प्रकारचा हा हल्ला असल्याचे मानले जाते. नवख्या किंवा तंत्रज्ञानातील हौशी मंडळींनी हा हल्ला केलेला नाही; तसेच हा एखाददुसरा प्रकार नाही, असे ट्विटरचे माहिती सुरक्षा संचालक बॉब लॉर्ड यांनी सांगितले.
ते म्हणाले, की अमेरिकी तंत्रज्ञान व माध्यम कंपन्यांवर असे मोठय़ा प्रमाणातील सायबर हल्ले आता होत आहेत. ट्विटरच्या माहितीसाठय़ातील माहिती लांबवण्याचा अनधिकृत प्रयत्न काल करण्यात आला आहे. अनेक मोठय़ा माध्यम कंपन्यांनाही सुरक्षा भेदून असे हल्ले करणाऱ्यांनी फटका दिला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ व ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ यांनी याच आठवडय़ात असे म्हटले होते, की आमची संकेतस्थळे हॅक करण्यात आली असून हा सगळा प्रकार चीनच्या सायबर हल्लेखोरांनी केला आहे. ट्विटरने मात्र हा हल्ला कुणी केला असावा याबाबत काहीही म्हटलेले नाही. ट्विटरचे अधिकारी लॉर्ड यांनी सांगितले, की हल्लेखोर हे अतिशय तंत्रकुशल असावेत व काही कंपन्या व संस्थांवर अशाच पद्धतीचे सायबर हल्ले झाले आहे. सायबर हल्ला करणाऱ्यांना युजरनेम, इमेल व पत्ते तसेच पासवर्ड व इतर माहितीही चोरण्यात यश आले असावे असा अंदाज आहे. ट्विटरने खबरदारीचा उपाय म्हणून वापरकर्त्यांना मेल पाठवले असून त्यांना नवीन पासवर्ड तयार करण्याचा सल्ला दिला आहे. ट्विटरने डिसेंबरमध्ये असे जाहीर केले होते, की त्यांचे क्रियाशील वापरकर्ते हे २० कोटी आहेत व त्यांची संख्या वाढतच आहेत. एका व्यक्तीकडून अनेकांना संदेश अशा प्रकारचा हा संदेश देवाण-घेवाणीचा मंच असून त्यावर मतमतांतरे,बातम्या, विचार यांचे आदान-प्रदान होत असते. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ व ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ यांच्या संकेतस्थळावर हल्ला करणाऱ्यांनीच हा हल्ला केला किंवा काय हे समजू शकले नाही. अलिकडच्या काळात अमेरिकेच्या अनेक माध्यमस्थळांवर चिनी हॅकर्सनी हल्ले केले असून ते चीन सरकारच्या गुप्तहेर संस्थेच्या वतीनेच घडवून आणण्यात आले असावेत असा विश्लेषकांचा अंदाज आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी गुरुवारी असे सांगितले, की अमेरिकी प्रशासनाच्या संस्था व खासगी कंपन्यांवर हॅकिंग हल्ले वाढले आहेत.