सध्या आपल्या देशात 5G सेवेला सुरूवातही झालेली नाही. तसंच ही सेवा केव्हापासून सुरू होणार याबाबतही माहिती नाही. परंतु अशा परिस्थितीत 5G मध्ये सिमकार्ड अपग्रेड करून घेण्यासाठी आलेला फोन उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका व्यक्तीला फारच महागात पडला आहे. सिमकार्ड अपग्रेड करून देण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीला तब्बल १० लाखांचा गंडा पडला. गंडा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीनं लिंक रोड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सध्या सायबर सेल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 5G मध्ये सिमकार्ड अपग्रेड करण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीच्या पॅनकार्डचीही माहिती घेतल्याचं समोर आलं आहे.

१९ जुलै रोजी आपल्याला एक फोन आला आणि त्यात त्यांनी सिमकार्ड 5G मध्ये अपग्रेड करत असल्याचं सांगितलं. तसंच या केव्हायसी प्रक्रिया आवश्यक असल्याचंही समोरून सांगण्यात आलं. त्यानंतर बोलण्यात गुंतवून पॅनकार्डाची माहिती घेम्यात आली. तसंच यानंतर पुन्हा एकदा फोन येईल आणि ही प्रक्रिया पूर्ण होईल, असं सांगण्यात आल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता पुन्हा एकदा फोन आला. त्यावेळी केव्हायसीसाठी कोणाचा फोन आला का नाही अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी संबंधित व्यक्तीनं आपल्याला कोणाचाही फोन आला नसल्याचं सांगितलं. त्यानंतर काही वेळानं त्यांना व्हेरिफेशनसाठी पुन्हा एकदा फोन आला. त्यावेळी आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु संबंधित व्यक्तीला काही संशय आल्यानं त्यानं व्हेरिफिकेशन करण्यास नकार दिला. परंतु यानंतर लगेचच त्यांच्या खात्यातून १० लाख रुपये कापले गेल्याचा मेसेज आला.