सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड करुन महिलांना टार्गेट करण्याचे प्रकार नेहमीच घडतात. पण अहमदाबादमध्ये चक्क एका तरुणाला सोशल मीडियावर टार्गेट करण्यात आले आहे.  या तरुणाचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या तरुणाने त्याच्या माजी प्रेयसीवर संशय व्यक्त केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बडोदामध्ये राहणा-या एका तरुणाचे नुकतेच त्याच्या प्रेयसीसोबत ब्रेक अप झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याला एका सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे फोटो असलेले बनावट अकाऊंट दिसले. वेगवेगळ्या नावाने सुरु केलेल्या या अकाऊंटवर त्या तरुणाचे आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करण्यात आले होते. हॉटेलमध्ये आंघोळ करतानाचा फोटोही त्या तरुणाला दिसला. या सर्व फोटोंच्या आधारे त्या तरुणाला त्याच्या माजी प्रेयसीवर संशय आला. तरुणाने सध्या या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही. पण त्याने अहमदबादमधील सायबर कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली आहे. हे सर्व बनावट अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी त्या तरुणाचे प्रयत्न सुरु आहेत.

अहमदाबादमधील गुन्हे शाखेने सायबर कायद्याविषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात हे प्रकरण उजेडात आले. अहमदाबादमधील सायबर विभागाकडे तक्रारींचे तब्बल ३०० अर्ज दाखल झाले. त्यापैकी ४० टक्के महिलांची तक्रार छायाचित्र, मोबाईल नंबर सोशल मीडियावर अपलोड करुन त्यांना त्रास दिल्याची होती.