आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केल्याने स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी दिली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

“खूप तपास केल्यानंतर आम्ही चार आरोपींना अटक केली होती. ३० तारखेला त्यांना अटक केली होती. ४ तारखेला आम्हाला आरोपींची कस्टडी मिळाली. यावेळी आम्ही गुन्हा कसा केला याची चौकशी सुरु केली. यावेळी त्यांनी पीडितेचा मोबाइल आणि इतर गोष्टी घटनास्खळी लपवल्या असल्याचं सांगितलं. आरोपींना घेऊन पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. त्यांनी फायरिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनीही गोळीबार केला असता चौघांचा मृत्यू झाला,” अशी माहिती व्ही सी सज्जनार यांनी दिली आहे.

आणखी वाचा- #HyderabadEncounter: महिलांनी पोलिसांना राखी बांधत केलं सेलिब्रेशन

कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा मध्येही आरोपींना अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता त्यादृष्टीने तपास करत आहोत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच आम्ही सर्व चौकशीला जाण्यास तयार आहोत असंही यावेळी व्ही सी सज्जनार यांनी स्पष्ट केलं. आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवले जातील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. शस्त्र कायद्यांतर्गतही गुन्ह्याची नोंद झाली आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.