सायकल चालवणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. मात्र सायकल चालवणे हे अर्थव्यवस्थेसाठीही फायद्याचे आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. १२० दिवसांसाठी रोज ३.५ किलोमीटर अंतर सायकलने प्रवास केल्यास ते भारताच्या जीडीपीसाठीही (ढोबळ आर्थिक उत्पन्नासाठी) फायद्याचे ठरेल आणि देशाच्या १.८ लाख कोटी रुपयांची बचत होईल. ही रक्कम भारतीय जीडीपीच्या १.६ टक्के इतकी असल्याचे ‘द एनर्जी अॅण्ड रिसोर्सेस इन्सटीट्यूशन’ने (टीईआरआय) केलेल्या एका अभ्यासात समोर आले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार टीईआरआयने ‘बेनिफिट्स ऑफ सायकलिंग इन इंडिया: अॅन इकनॉमिकल, एनव्हायरमेन्ट अॅण्ड सोशल असेसमेन्ट’ या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार १२० दिवसांसाठी रोज ३.५ किलोमीटरपर्यंत सायकल चालवल्यास ४ हजार ७५६ जणांचा अवेळी होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो. तसेच यामुळे दहा लाख टन कार्नबडाय ऑक्साइड गॅसचे उत्सर्जन रोखता येईल असंही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय केवळ चार महिन्यांसाठी रोज साडेतीन किलोमीटरपर्यंत सायकल चालवल्यास देशातील तेल उत्पन्नांची गरज ०.३५ टक्क्यांनी कमी होईल.

नियमित सायकल चालवल्याने जनतेकडून पेट्रोलसाठी खर्च होणारे २ हजार ७०० कोटी रुपयांची बचत होईल. तर प्रवसासाठी लागणाऱ्या वेळेसंदर्भातील बचतीचा आकडा ११ हजार २०० कोटी इतका असेल. याशिवाय नियमित सायकल चालवल्याने वायू प्रदूषण कमी होऊन त्यापासून होणारा एकूण फायदा हा २४ हजार १०० कोटी रुपये इतका असेल असं हा अहवाल सांगतो. तर शारिरिक दुखापतींवरील १.४ लाख कोटी रुपयांची बचत होईल. थोडक्यात सांगायचे झाल्यास देशाची एकूण बचत १.७८ लाख कोटी रुपये इतकी होईल असं या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील जनतेला सायकलिंगसाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने सध्या ५००० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सायकलींवरील जीएसटीची टक्केवारी १२ टक्क्यांवरून कमी करुन ५ टक्क्यांपर्यंत आणावी असा सल्लाही या अहवालामध्ये देण्यात आला आहे. ‘अल्प उत्पन्न गटातील लोकांनाही सायकल विकत घेता यावी या उद्देशाने सायकलींचे दर कमी करण्याची गरज आहे’ असं या अहवालात म्हटले आहे.

भारतामध्ये सायकलिंग करणाऱ्या सायकलचालकाची सुरक्षा आणि प्रवासासाठी सायकलचा कमीतकमी होणारा वापर या दोन सर्वात मोठ्या समस्या असल्याचे सांगितले मत ‘टीईआरआय’चे महासंचालक डॉ. अजय माथूर यांनी व्यक्त केले आहे. ‘आपण सायकलबद्दलची आपली मानसिकता बदलायला हवी. फिट राहण्यासाठी सायकल वापरली पाहिजे मात्र त्याचवेळेस आपल्या वसुंधरेचे नुकसान होणार नाही यासाठीही सायकल वापरायला हवी’ असं माथूर म्हणाले.

पाश्चिमात्य देशांमध्ये सायकलकडे प्रवासाचे साधन म्हणून पाहिले जाते. जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये विशेष सोयी पुरवल्या जातात. ‘टीईआरआय’च्या अहवालानुसार नेदरलॅण्डमध्ये दरवर्षी सायकलींगमुळे साडेसहा हजार जणांचे प्राण वाचतात. तर आरोग्यावर होणाऱ्या खर्चाचे १९ बिलीयन युरोंची बचत होते. याचप्रमाणे बार्सलोनामधील कार्यलयांमध्ये सायकलने जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण ७२.५ टक्क्यांनी वाढल्याने वार्षिक सरासरी बचतीमध्ये ४.७ मिलियन युरोंनी (३२ कोटींहून अधिक रुपये) वाढ झाली आहे.