बुलबुल या चक्रीवादळानं मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम बंगालमधल्या सागर बेट आणि बांगलादेशमधल्या खेपुपारा या भागात धडक दिली. यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडत असून आतापर्यंत दोन जणांचे बळी गेले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे देखील नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळ १२ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. याशिवाय किनारपट्टी भागातील एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पुढील १२ तासांमध्ये बुलबुल चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलबुल’ हे चक्रीवादळ दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. ताशी १२० किलोमीटर या वेगाने ते ओडिशा, पश्चिम बंगालहून बांगलादेशकडे सरकत असल्याची माहिती आज हवामान खात्याने दिली. शनिवारी सायंकाळी पश्चिम आणि पूर्व मिदनापोर, दक्षिण आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० कि.मी. इतका होता तो ताशी ११० ते १२० इतका वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

बुलबुल चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे बारीक लक्ष असून मदतकार्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कोसळलेली झाडे रस्त्यांतून बाजूला सारण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने हाती घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आपतकालिन परिस्थितीचा आढावा घेतला. शिवाय या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.