‘हुडहुड’ चक्रीवादळाच्या तडाख्यात आंध्र प्रदेश आणि ओडिशातील किनारी जिल्ह्यांची रविवारी अक्षरश: वाताहत झाली. ताशी १८० किलोमीटर वेगाने धडकलेल्या या वादळासह झालेल्या मुसळधार पावसात दोन्ही राज्यांतील पाच जण ठार झाले. वादळात किनारी जिल्ह्यांतील वीज आणि संपर्क यंत्रणा कोलमडून पडली. वादळामुळे सकाळपर्यंत सुमारे दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. दरम्यान, वादळाचा जोर ओसरला असला तरी आगामी तीन दिवसांत छत्तीसगढ, बिहार आणि उत्तरप्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता असून लष्करी पथके तैनात करण्यात आली आहेत.

फोटो गॅलरी : ‘हुडहुड’ने वाताहत 

विशाखापट्टणम, श्रीकाकुलम आणि विजीयानागराम जिल्ह्यांना वादळाचा मोठा तडाखा बसल्याने येथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. दुपारी १२ च्या आधीच हुडहुड किनाऱ्याला धडकले. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसात जागोजागी पाणी साचले. काही ठिकाणी वृक्ष मुळांसकट उन्मळून पडले. किनाऱ्यालगतच्या झोपडय़ा वाऱ्याने उडून गेल्या. तर काही घरांवरील पत्रे उडून गेले.
आंध्रमधील चार जिल्ह्यांतील ९० हजार १३, तर ओदिशाच्या किनाऱ्यालगत राहणाऱ्या ६८ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

किनारी भागाला तडाखा देऊन पुढे सरकलेल्या वादळाचा जोर येत्या सहा तासांत ओसरेल. त्यानंतर १२ तासांत हे वादळ पूर्णपणे थंडावलेले असेल; परंतु आगामी तीन दिवसांत छत्तीसगढ, बिहार, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशसह पश्चिम बंगालमधील गंगा नदीच्या पट्टय़ात मुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याचे दिल्लीतील महासंचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी दिली.
आम्ही राज्य सरकारच्या सचिवालयांच्या सतत संपर्कात आहोत. त्यांना वेळोवेळी माहिती पुरवण्यात येत आहे, असेही राठोड म्हणाले.

हवामानातील बदलांमध्ये सध्या तरी कोणताही प्रभावी बदल जाणवत नसून दोन्ही राज्यांतील हवाई वाहतूक सोमवार सकाळपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मृतांमधील तीन जण हे आंध्रमधील असून ते चक्रीवादळात अडकल्याने तर ओदिशातील दोन जणांवर झाड कोसळल्याने ते मृत्युमुखी पडले.

*दोन्ही राज्यांच्या किनारी भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असले तरी काही लोक अद्यापही अडकलेले आहेत. यासाठी लष्कराची पथके आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्या मदतीला निमलष्करी दलेही आहेत.
*वादळाच्या तडाख्यात मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी झाली असली तरी जीवितहानी होऊ दिली जाणार नाही, यावर मदतकार्यातील सर्व पथकांचा भर असेल.
*सावधगिरीचा उपाय म्हणून राज्यातील, तसेच राज्याबाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
*आगामी तीन दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने छत्तीसगढमधील रायपूरमध्ये मदतकार्यासाठी लष्कराची पाच हेलिकॉप्टर तैनात ठेवण्यात आली आहेत.
*वादळात, तसेच मुसळधार पावसात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा इशारा नागरिकांना देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दीड लाख नागरिक सुरक्षित स्थळी
दोन्ही राज्यांत मिळून सुमारे १ लाख ६० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तरीही वादळाच्या तडाख्यानंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे किनाऱ्यालगतच्या भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले होते. याच वेळी मदतकार्य पुरवणाऱ्या पथकांना त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. तरीही काही पथकांतील जवानांनी जिवाची बाजी लावत पाण्यात अडकलेल्या लोकांना तेथून बाहेर काढले. सोमवारी पहाटेपर्यंत हे वादळ ओसरलेले असेल. त्यामुळे मदतकार्याचा वेग वाढलेला असेल. ‘हुडहुड’ वादळाने आंध्र आणि ओदिशा राज्यांना तडाखा दिला आहे. याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली असली तरी येत्या तीन दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कमालीची दक्षता बाळगण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत, असे कॅबिनेट सचिव अजितकुमार सेठ
यांनी स्पष्ट केले.

‘आमची तयारी झाली आहे’
आंध्र आणि ओदिशातील ‘हुडहुड’ वादळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. वादळाची पूर्वकल्पना केंद्राला मिळाल्यानंतर शनिवारी पंतप्रधानांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली. या वेळी त्यांनी वादळाच्या प्रभावातून वाचण्यासाठी आणि मदतकार्यात वेग आणण्यासाठी काय करता येईल, याची संपूर्ण माहिती केंद्रीय तसेच राज्य पथकांकडून घेतली. यावर केंद्रीय आणि राज्य स्तरावर तयारी पूर्ण झाल्याचे सेठ यांनी सांगितले.