प्रचंड वेगाने वाहणारे वारे. खळवलेल्या समुद्र आणि सहा ते आठ मीटर उंचीच्या जीवघेण्या लाटा. अगदी मृत्यूच चाल करून येतोय असं वाटावं. तौते चक्रीवादळ मुंबईपासून जात असताना अरबी समुद्रात हे दृश्य होतं, ‘बॉम्बे हाय’ परिसरातील. तराफ्यांवर असलेल्या लोकांना एकाच वेळी मृत्यूने चौहीबाजूंनी जणू वेढाच दिला होता. त्यात तराफाच भरकटला आणि बुडायला लागला. तराफ्यावरील लोकांच्या पायाखालून जमीनच सरकरली. पण तरीही धीर न सोडता त्यांनी तब्बल ११ तास संकटाशी लढा दिला आणि सुखरूप बाहेरही पडले. पी-३०५ तराफ्यावरील कर्मचारी किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांचा अश्रूंचा बांध फुटला.

तौते चक्रीवादळामुळे अरबी समुद्राला प्रचंड उधाण आलं होतं. चक्रीवादळ आणि मोठंमोठ्या लाटा यामुळे समुद्रात ७०७ कर्मचारी असलेले तीन तराफे भरकटले आणि यातील ‘पी-३०५’ तराफा मुंबईपासून समुद्रात सुमारे ३५ सागरी मैल अंतरावर बुडाला. तर इतर तराफे भरटकले होते. या तराफ्यांवरील कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली होती. आयएनएस कोच्ची, आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार या युद्धनौकांसह इतर नौका मदत कार्यात दाखल झाल्या होत्या. तर नौदलाचं पी ८१ हे विमान तराफ्याच्या क्षेत्रात घिरट्या घालून कर्मचाऱ्यांचा शोध घेत होते.

सोमवारी रात्रीपासून हे शोध आणि बचाव कार्य सुरू असून, अद्यापही सुरू आहे. खवळेल्या समुद्रात ही शोध मोहीम राबवत युद्धनौकांनी पी ३०५ तराफ्यावरील १८४ कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं. १८४ कर्मचाऱ्यांना घेऊन आयएनएस कोची बुधवारी सकाळी मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल झाली. त्यानंतर मृत्यूला स्पर्श करून आलेल्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. किनाऱ्यावर उतरल्यानंतर बस हे कर्मचारी रवाना झाले. पण, तब्बल ११ तास समुद्रात तग धरून भीती दडपून टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. नौदलाचे खूप खूप धन्यवाद! त्यांच्यामुळेच आम्ही जिवंत आहोत, नाहीतरी कुणीच वाचलं नसतं. सगळ्यांची माझ्यासारखीच अवस्था झालेली आहे,” असं सांगताना एका कर्मचाऱ्यांना भावना अनावर झाल्या होत्या.

‘पी-३०५’ तराफा मुंबईपासून समुद्रात अंतरावर बुडाला. या तराफ्यातून १८४ जणांची सुटका करण्यात नौदलाला यश आलं. आयएनएस बेटवा, आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता या युद्धनौका शोध आणि मदतकार्यात दाखल झाल्या. नौदलाची आयएनएस तलवार युद्धनौकाही मदतकार्यात दाखल झाली असून, समन्वयकाची भूमिका पार पाडत आहे. तर पी-८१ विमान सध्या आकाशातून कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. तर आयएनस कोचीतून १८४ कर्मचारी बुधवारी मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल झाले. तराफा बुडायला लागला, तेव्हा मी समुद्रात उडी घेतली. तब्बल ११ तास समुद्रात तग धरून होतो. त्यानंतर नौदलाने आम्हाला बाहेर काढलं,” अंगावर शहारा आणणारा अनुभव पी-३०५ तराफ्यावरून सुखरूप परतलेल्या अमित कुमार कुशवाह यांनी सांगितला.

१८४ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. नौदलाच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांकडून शोधमोहिम अजूनही सुरूच आहे. त्या परिसरात असलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. आपण आशावादी असायला हवं. सध्या परिस्थितीत सुधारणा झाली असून, सगळ्यात वाईट अनुभव आपल्या पाठीशी आहे,” असं कॅप्टन सचिन सिक्वेरा माध्यमांशी बोलताना म्हणाले.

समुद्रात चक्रीवादळाशी जीवघेणं युद्ध

बॉम्बे हाय येथील अफकॉन या कंत्राटदाराकडील कर्मचारी पी ३०५ तराफ्यावर होते. सोमवारी पहाटे सोसाट्याचा वारा आणि खवळलेल्या समुद्रामुळे तराफ्याचे नांगर तुटून ते समुद्रात भरकटले. या तराफ्यावरून सोमवारी सकाळी मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. तराफा भरकटल्यानंतर बुडू लागल्याने जीवरक्षक जॅकेट घालून कर्मचाऱ्यांनी खवळलेल्या समुद्रात उड्या मारल्या. अनेक तास कर्मचारी खवळलेल्या समुद्रात या जॅकेटच्या आधारे तरंगत मदतीची प्रतीक्षा करत होते. सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नौदलाची आयएनएस कोची युद्धनौका मदतीसाठी दाखल झाली. सोमवारी रात्रभर नौदलाकडून कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू होती. मात्र अंधार आणि प्रचंड मोठ्या लाटा यामुळे शोध घेताना अडचण येत होते. मंगळवारी सकाळी वादळाचा प्रभाव कमी झाल्यावर नौदलाच्या मोहिमेला वेग आला. त्यानंतर तराफ्यावरील २७३ पैकी १८४ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलं.