News Flash

Cyclone Yaas – यास चक्रीवादळाचा मिदनापूर, २४ परगणाला धोका, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा रात्री नियंत्रण कक्षातच मुक्काम!

यास चक्रीवादळाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज रात्रभर नियंत्रण कक्षातच मुक्काम ठोकून राहणार आहेत.

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या यास चक्रीवादळासाठी आता सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. एनडीआरएफ, कोस्ट गार्डसह भारतीय नौदलानं देखील कंबर कसली आहे. ओडिशामधल्या धामरा बंदर परिसरात यास चक्रीवादळाचा लँडफॉल होणार असला, तरी त्याचा फटका वर पश्चिम बंगालच्या किनारी भागांना देखील बसणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या ममता बॅनर्जी यांनी देखील कंबर कसली असून मंगळवारी रात्रभर त्या नबाना येथील नियंत्रण कक्षातच ठाण मांडून बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बुधवारी २६ मे रोजी सकाळी यास चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर थडकणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आजची पूर्ण रात्र नबाना येथील मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी म्हणजे बुधवारी सकाळी यास चक्रीवादळ सुमारे १८५ किलोमीटर प्रतितास वेगाने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर थडकणार आहे. त्यादरम्यान, बचावकार्य आणि पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी रात्रभर नियंत्रण कक्षात थांबणार आहेत.

 

यंत्रणा सज्ज, प्रशासन सतर्क!

पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ५४ हजार अधिकारी आणि कर्मचारी, २ लाख पोलीस-होमगार्ड कर्मचारी, एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर्व मिदनापूर जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज आहे. त्यासोबतच उत्तर परगणा आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांना देखील वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करावा लागणार आहे. कोलकाता, हावडा आणि हुगळी या शहरांमध्ये देखील चक्रीवादळाचा परिणाम दिसून येईल. ओडिशामधील जगतसिंहपूर, केंद्रापारा, भद्रक, बालासोर आणि पश्चिम बंगालमधल्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातून जाताना हे वादळ टप्प्याटप्प्याने १५५ किमी प्रतितास, १६५ किमी प्रतितास आणि शेवटी १८५ किमी प्रतितास वेग धारण करेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

Cyclone Yaas : यास चक्रीवादळाचा धामरा बंदरावर होणार लँडफॉल! १२ तास घालणार थैमान!

धामरा-चंदबलीच्या मध्ये लँडफॉलचा केंद्रबिंदू!

ओडिशाच्या भद्रक जिल्ह्याच्या किनारपट्टीवर असणाऱ्या धामरा बंदरावर बुधवारी पहाटे ५ ते ६ च्या सुमारास यास चक्रीवादळाचा लँडफॉल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. भुवनेश्वरच्या विभागीय हवामान विभागातील वैज्ञानिक डॉ. उमाशंकर दास यांनी लँडफॉलाच केंद्रबिंदू धामरा आणि चंदबली जिल्ह्याच्या मधे कुठेतरी असेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 7:47 pm

Web Title: cyclone yaas update live imd west bengal chief minister mamata banerjee to stay in control room pmw 88
टॅग : Climate,Mamata Banerjee
Next Stories
1 नको आरटीपीसीआर, नको अँटिजेन….कुत्रेही शोधू शकतात करोनाचे रुग्ण
2 ‘या’ देशात राजकीय संकट गहिरं; राष्ट्रपती, पंतप्रधान लष्कराच्या ताब्यात
3 विशाखापट्टनम : हिंदुस्थान पेट्रोलियमच्या रिफायनरीमध्ये स्फोट; अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण