बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून ‘निवार’ हे वादळ आता आणखी तीव्र झाले आहे. तामिळनाडू व पुडुच्चेरीच्या किनारी भागात हे वादळ तडाखा देणार असल्याचा हवामान विभागाने काल अंदाज वर्तवला होता. त्यानुसार हे वादळ आता पुडुच्चेरीपासून १२० किलोमीटर अंतरावर आहे व त्याचा वेग ११ किलोमीटर प्रतितास आहे. आज रात्री २ वाजेच्या सुमारास हे वादळ दक्षिण तटास धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमधून एक लाखापेक्षा अधिक जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

यानंतर हे वादळ कराईकल (आंध्रप्रदेश) आणि महाबलीपुरम (तामिळनाडू) ओलांडेल. तिथून वादळ जात असताना हवेचा वेग १४५ किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने युद्धपातळीवर पूर्वतयारी केलेली आहे. तामिळनाडूमधून एक लाखांपेक्षा अधिकजणांचे व पडुच्चेरी येथून सात हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. चेन्नई विमानतळ आज सायंकाळी ७ वाजेपासून ते उद्या सकाळी ७ वाजेपर्यंत बंद करण्यात आले आहे. या अगोदर २६ विमानं रद्द केली होती. शिवाय, चेन्नई अनेक भागांमध्ये वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आलेला आहे. तामिळनाडूमधील १६ जिल्ह्यांमध्ये उद्या सुट्टी घोषित करण्यात आली आहे. निवारचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या अनेक तुकड्या देखील दाखल झालेल्या आहेत. तसेच, उद्या (२६ नोव्हेंबर) रोजी होणारी यूजीसी-नेट २०२० ची परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. चेन्नईमध्ये मागील २४ तासांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे.

बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्येकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. तो नंतर पश्चिम-वायव्येकडे वळत तीव्र झाला नंतर त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.