मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्य़ात पेटलवाड येथे एका इमारतीत ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन ८९ ठार तर १०० जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, हॉटेल असलेल्या तीन मजली इमारतीत स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर होते, त्याच्या शेजारी स्फोटकांचा साठा असलेली इमारत होती, त्यामुळे हा स्फोट झाला. दोन्ही इमारतींचे यात मोठे नुकसान झाले असून मोठय़ा भागात त्याचा परिणाम झाला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी अरूण शर्मा यांनी सांगितले की, ८२ मृतदेह सापडले असून त्यातील साठ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. विभागीय उपायुक्त संजय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार ढिगारा उपसण्याचे काम अजून चालू आहे त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरे वाटावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. मध्य प्रदेश सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असे त्यांनी सांगितले. पेटलवाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी ए.आर.खान यांनी सांगितले की, इमारतीच्या भांडारगृहात खाणींसाठी वापरली जाणारी स्फोटके मोठय़ा प्रमाणात होती. त्यांचा सकाळी साडेआठच्या सुमारास स्फोट झाला, या दुर्घटनेत आतापर्यंत ६० पेक्षाही अधिक मृतदेह सापडले आहेत. ढिगारा उपसण्याचे काम चालू आहे. झाबुआच्या जिल्हाधिकारी अरुणा गुप्ता यांनी सांगितले, की ढिगाऱ्यातून ३५ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून नेमकी संख्या समजलेली नाही, दरम्यान मदतकार्य सुरू आहे. झाबुआचे पोलीस अधीक्षक जी.जी.पांडे, आदिवासी विकास मंत्री अंतरसिंह आर्य हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. गृहमंत्री बाबुलाल गौर यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपये भरपाई जाहीर केली. दरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक झाबुआला गेले असून मदतकार्यात सहभागी होत आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक ओ.पी.सिंह यांनी सांगितले की, विविध यंत्रांनी सज्ज असलेले पथक गुजरातेतील बडोदा येथून झाबुआला पाठवण्यात आले आहे.