टाटा समूहाची धारक कंपनी असणाऱ्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आलेले सायरस मिस्त्री आपले गाऱ्हाणे ऐकविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेण्याची शक्यता आहे. रतन टाटा यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या सायरस मिस्त्री यांची सोमवारी अध्यक्षपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर मिस्त्री यांना दूर करण्याचा हा निर्णय गैर असल्याची प्रतिक्रिया शापूरजी पालनजी समूहाकडून व्यक्त करण्यात आली होती. टाटा समूहाच्या अध्यक्षपदी असतानाही सायरस मिस्त्री यांनी राजकीय संबंध वाढविण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले होते. त्यामागे रतन टाटा यांचा वारसदार म्हणून प्रतिमा निर्मिती करणे आणि टाटा समूहात स्वत:चे स्थान बळकट करण्याचा उद्देश असल्याचे बोललं जातं. त्यामुळे आता अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर मिस्त्री यांच्याकडून कायदेशीर कारवाईबरोबरच राजकीय मार्ग चोखाळला जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, टाटा समूहाने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर कॅव्हेट दाखल केल्याने आता मिस्त्री विरुद्ध टाटा असा कायदेशीर लढा रंगण्याची चिन्हे आहेत. सायरस मिस्त्री यांनीही सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केल्याची चर्चा होती. पण सायरस मिस्त्री यांच्या कार्यालायने हे वृत्त फेटाळून लावले होते.
‘टाटा’ नसलेले सायरस मिस्त्री दुसरे, तर १५० वर्षांतील सहावे अध्यक्ष वयाच्या पन्नाशीच्या आत टाटा समूहाचे अध्यक्षपद आपल्याकडे दीर्घकाळ ठेवण्याची कारकिर्द सायरस मिस्त्री यांना मात्र राखता आली नाही. अध्यक्षपदाची पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मिस्त्री यांना थेट समूहातूनच बाहेर जावे लागले.