भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात विकली जाणारी कॉम्बिफ्लेम, डी-कोल्ड टोटल, ऑफ्लेक्स १०० डीटी ही औषधे दुय्यम दर्जाची असल्याचे सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायजेशनने (सीडीएससीओ) म्हटले आहे. सीडीएससीओने मागील महिन्यात चाचणी घेतली होती. त्या चाचणीमध्ये ही औषधे दुय्यम दर्जाची असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. या चाचणीनंतर सीडीएससीओने ६० औषधांची यादी दिली आहे. ही औषधे वापरताना सावधानता बाळगावी असे त्यांनी म्हटले आहे.

मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये काही औषधे अनुत्तीर्ण झाली आहेत. त्यानंतर त्यांनी ही सूचना दिली आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये कॉम्बिफ्लेमची एक संपूर्ण बॅच अनुत्तीर्ण झाली होती. त्यानंतर कॉम्बिफ्लेमच्या मागील वर्षी तीन चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्या चाचण्यांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यानंतर सीडीएससीओने कॉम्बिफ्लेमला दुय्यम दर्जाचे औषध म्हटले आहे.

२०१५ मध्ये कॉम्बिफ्लेमची चाचणी घेण्यात आली होती. वेगवेगळ्या घटकांवर ही चाचणी आधारित असते. त्या पैकी काही घटकांमध्ये काही बॅचची औषधे अनुत्तीर्ण झाली असे कॉम्बिफ्लेमची निर्मिती करणाऱ्या सनोफी इंडियाने कबूल केले आहे. सीडीएससीओ कडून आम्हाला नोटीस आल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू असे सनोफी इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. कॉम्बिफ्लेमची गोळी ही भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वेदनाशामक गोळ्यांपैकी एक आहे. आम्ही या गोळीची विक्री गेली २५ वर्षे करत आहोत. ही गोळी सुरक्षित आहे असे स्पष्टीकरण सनोफीच्या प्रवक्त्यांनी दिले आहे. मागील वर्षी १७० कोटी रुपयांच्या कॉम्बिफ्लेमची विक्री झाली होती.