कॉम्रेड गोविंद पानसरे, अंनिसचे नरेंद्र दाभोळकर आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी हे बोलले म्हणून मारले गेले असे मत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी व्यक्त केले आहे. समाजातील वाईट रुढी, परंपरा याविरोधात त्यांनी आवाज उठवला, ते बोलले आणि ते बोलले म्हणूनच मारले गेले असेही गुलजार यांनी म्हटले आहे. विचारवंत हे समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात. अशात या विचारवंतांच्या हत्या होणे ही बाब दुर्दैवी आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ‘द वॉल’ ने गुलजार यांची एक मुलाखत घेतली त्या मुलाखतीत त्यांना समाजात घडलेल्या विचारवंतांच्या हत्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

अंधश्रद्धा निर्मूलन हे व्रत मानून त्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांची हत्या ते मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ ला करण्यात आली. त्यांचे मारेकरी शोधण्यात अद्यापही यश आलेले नाही. एम एम कलबुर्गी हे विचारवंत आणि लेखक होते. धारवाडमध्ये ३० ऑगस्ट २०१५ ला त्यांनाही ठार करण्यात आले, त्यांचे मारेकरीही अद्याप सापडलेले नाहीत. तर गोविंद पानसरे हे डाव्या विचारांचे समर्थक होते. १६ फेब्रुवारीला त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या तिन्ही घटनांबाबत गुलजार यांनी दुःख व्यक्त केल.

नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे हे दोघेजण असोत किंवा कलबुर्गी असोत. प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. ते बोलले म्हणून मारले गेले असेही गुलजार यांनी स्पष्ट केले. गुलजार यांना या मुलाखतीत वृत्तपत्रांबाबतही प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही कोणत्या प्रकारची वृत्तपत्रे वाचता हे विचारले असता गुलजार यांनी सांगितले की ते फक्त इंग्रजीच वृत्तपत्रच वाचतात. मात्र जेव्हा काही गंभीर घटना घडतात तेव्हा मी हिंदी आणि मराठीही वृत्तपत्रे वाचतो असे गुलजार यांनी स्पष्ट केले.