उत्कृष्ट अभिनयाने अवघ्या सिनेजगतात आपले वेगळे स्थान आणि ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राण यांनी आतापर्यंत ३५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.
‘राम और शाम’, ‘मधुमती’, ‘आदमी’, ‘जीस देश में गंगा बेहती है’, ‘जंजीर’  या सिनेमांतील प्राण यांच्या खलनायकाच्या भूमिका भरपूर गाजल्या.  
‘व्हिलन’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात एखाद्या ‘हिरो’ सारखे स्थान प्राण यांनी मिळविले आणि असे स्थान मिळवणे कठीणचं. पण, ते स्थान प्राण यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मिळविले. प्राण यांच्या खलनायकाच्या भूमिका प्रेक्षकांना इतक्या आवडू लागल्या होत्या की, १९६९-१९८२ या काळात चित्रपटातील नायकापेक्षाही अधिक मानधन प्राण यांना मिळाले होते. यावरुन प्राण यांच्या अभिनयातले कसब लक्षात येते.   
त्यामुळे अशा हरहुन्नरी अभिनेत्याला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार देऊन गौरव करणे ही अवघ्या सिनेसृष्टीसाठी आनंदाची गोष्ट आहे.

ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना आतापर्यंत मिळालेले काही प्रमुख पुरस्कार
* उत्कृष्ट सह-कलाकार म्हणून तीन वेळा फिल्म फेअर पुरस्काराने गौरव
* फिल्म फेअरचा जिवनगौरव पुरस्कार
* १९८३- कलाभूषण पुरस्कार
* २००१- पद्म भुषण पुरस्काराने गौरव
याआधीचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांना प्रदान करण्यात आला होता. मानचिन्ह आणि दहा लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.