दादरी येथे जमावाने मोहम्मद इखलाक याला ठार मारल्याच्या प्रकरणाची आणखी चौकशी होण्याची आपल्याला अपेक्षा नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले असल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने केल्याच्या दुसऱ्याच दिवशी, ‘न्याय मिळवण्यासाठी मी कुठल्याही स्तरापर्यंत जाईन’, असे इखलाकच्या मुलाने म्हटले आहे.
या प्रकरणात आम्हाला आणखी तपास करण्यात येऊ नये असे मी म्हटलेलेच नसल्याचे इखलाकचा मुलगा सरताज सैफी याने सोमवारी स्पष्ट केले. उत्तर प्रदेश पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईबाबत मी समाधानी असून, सीबीआयमार्फत चौकशीची मला आत्ताच आवश्यकता वाटत नाही एवढेच मी म्हटले होते. न्याय मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरापर्यंत जावे लागले, तरी मी जाईन असे मी म्हटले होते, असे सैफीने ट्विटरवर लिहिले.
इखलाकची आई, भाऊ व इतर नातेवाईकांनी रविवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची रविवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या प्रकरणी झालेल्या कारवाईबाबत आम्ही समाधानी असून, यापुढे तपास व्हावा अशी आमची अपेक्षा नाही, असे त्यांनी म्हटल्याचे एका सरकारी प्रवक्त्याने काल सांगितले होते.