संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या उत्तर प्रदेशमधील दादरी येथील हत्याकांड प्रकरणातील पीडित मोहम्मद अखलाखच्या घरात गोमांसच असल्याचा अहवाल मथुरा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिल्यानंतर सूरजपूरमधील न्यायालयाने अखलाखच्या कुटुंबीयांविरोधात गोहत्येच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
वाचा : २० दिवसांत अखलाखच्या कुटुंबाविरुद्ध कारवाई करा नाहीतर…
उत्तर प्रदेशमधील दादरी गावात मोहम्मद अखलाख यांच्या घरात गोमांस साठवून ठेवले आहे आणि शिजवले जात आहे, असे गेल्यावर्षी २८ सप्टेंबरला स्थानिक मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर १०० ते २०० गावकऱ्यांचा जमाव त्याच्या घराजवळ गोळा झाला. संतप्त जमावाने अखलाखला घरातून बाहेर खेचून दगड-विटांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा दानिश याच्या कवटीला गंभीर इजा पोहोचली होती. या प्रकरणावरून देशात असहिष्णुतेसंदर्भात मोठे वादंग माजले होते.
स्थानिक गौतम बुद्ध नगर पोलिसांनी अखलाखच्या घरातील फ्रिजमध्ये सापडलेले मांस बोकडाचे होते असा अहवाल दिला होता. पण महिनाभरापूर्वीच मथुरा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ते मांस गोवंशाचे असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय बळावला. गोहत्या केल्याबद्दल अखलाखच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारी एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे आदेश दिले.
वाचा : दादरी घटनेतील अखलाखच्या घरात गोमांस असल्याचा नवा अहवाल