देशात करोनाच्या १३.३६ कोटी चाचण्या आतापर्यंत करण्यात आल्या असून दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण १०,९९,५४५ आहे.  रोजच्या करोना रुग्णांचे प्रमाण ४ टक्क्यांच्या खाली गेले आहे, असे आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले आहे.

देशात गेल्या सहा दिवसांत रोज ४० हजार नवीन करोना रुग्ण सापडले असून ८ नोव्हेंबरपासून दैनंदिन रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या खाली आहे. सरासरी रोज १० लाख चाचण्या केल्या जात असून त्या सकारात्मक येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार खूप मोठय़ा प्रमाणात होतो आहे असे नाही. दर दहा लाखांमागे ९६८७१ चाचण्या होत असून भारताची चाचण्या पायाभूत व्यवस्था वाढवली असून देशात २१३४ प्रयोगशाळांत या चाचण्या केल्या जात आहेत. दिवसाला दहा लाखाहून अधिक चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ओलांडण्यात आले असून गेल्या २४ तासांत १०,९९,५४५ चाचण्या झाल्या आहेत.

पुनरावर्ती राष्ट्रीय चाचणी सकारात्मकता दर ६.८७ टक्के असून  तो सात टक्क्यांच्या खाली आहे. दैनंदिन संसर्ग दर ३.४५ टक्के म्हणजे ४ टक्क्य़ांच्याही खाली आहे. जास्त चाचण्या व कमी संसर्ग दर अशी सध्याची स्थिती आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही गेल्या काही आठवडय़ात कमी झाली असून ४२३१४ रुग्ण बरे होऊन २४ तासांच्या काळात घरी परतले आहेत.

एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ८६ लाखांवर गेली आहे. १० राज्यात ७५.७१ टक्के लोक बरे झाले असून दिल्लीत २४ तासांतील दैनंदिन संसर्ग दर सर्वाधिक ७२१६, केरळात ५४२५ व महाराष्ट्र ३७२५ याप्रमाणे आहे. दहा राज्यांत नव्याने  संसर्गाचा दर ७७.०४ टक्के असून  दिल्लीत रोज सरासरी ४४५४ तर महाराष्ट्रात ४१५३ रुग्ण सापडत आहेत. २४ तासांत देशात ४८० बळी गेले आहेत. दहा राज्यांत नव्याने बळी गेलेल्यांचे प्रमाण ७३.५४ असून त्यात दिल्ली १२१, पश्चिम बंगाल ४७, महाराष्ट्र ३० याप्रमाणे संख्या आहे.

३७ हजार ९७५ नवे बाधित

देशात एका दिवसात ३७ हजार ९७५ जणांना नव्याने करोनाची लागण झाल्याने देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ९१.७७ लाखांवर पोहोचली आहे, तर करोनातून ८६ लाखांहून अधिक  जण बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

देशातील करोनाबाधितांची संख्या ९१ लाख ७७ हजार ८४० झाली असून ४८० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक लाख ३४ हजार २१८ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये १२१ जण दिल्लीतील आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या सलग चौदाव्या दिवशी पाच लाखांपेक्षा कमी असून ती चार लाख ३८ हजार ६६७ इतकी म्हणजे एकूण संख्येच्या ४.७८ टक्के इतकी आहे, असेही आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ८६ लाख चार हजार ९५५ इतकी असल्याने बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण ९३.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १.४६ टक्के इतके आहे.