पेट्रोल आणि डिझेलचे दर यापुढेही दररोज बदलणार असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. मागील दोन महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात साडेसहा रुपयांची वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर यापुढेही पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत राहणार का, असा प्रश्न प्रधान यांना विचारण्यात आला. यावर बोलताना पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणे सामान्य ग्राहकासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

पेट्रोलिय मंत्रिपदाचा स्वतंत्र कारभार असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री पदावर बढती मिळाली. याशिवाय त्यांच्याकडे कौशल्य विकास खात्याचा पदभारदेखील देण्यात आला. ‘पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झाल्यास त्याचा फायदा लगेच नागरिकांना मिळतो. याशिवाय इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाल्यास ती एकाएकी न होता हळूहळू लागू होते,’ असे धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले.

‘दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलणे ग्राहकांच्या हिताचे आहे. त्यामुळे यामध्ये बदल करायची आवश्यकता वाटत नाही,’ असे त्यांनी सांगितले. सरकारी मालकीच्या इंधन कंपन्यांनी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी १५ दिवसांनी बदलण्याच्या जुन्या परंपरेला मूठमाती दिली. यानंतर दर दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींनुसार ठरवण्यात येऊ लागले.

जून महिन्यात ही नवी पद्धत लागू करण्यात आल्यानंतरच्या पंधरवड्यात पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले होते. मात्र ३ जुलैनंतर पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. मागील दोन महिन्यांमध्ये नवी दिल्लीत पेट्रोलचे दर ६.६ रुपयांनी वाढून ६९.६६ रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचले. ऑगस्ट २०१४ नंतर प्रथमच दिल्लीत पेट्रोलची किंमत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय डिझेलच्या दरांमध्ये ४ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचे दर ५७.३८ रुपयांवर गेले आहेत.