दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या विविध कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापेमारी केली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. या कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. दैनिक भास्कर समूह हा देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक आहे.

कर चोरी प्रकरणात आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाचाच महत्त्वाचा भाग असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापेमारी केली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दैनिक भास्कर समूहाने करोना काळात गंग नदीत वाहून आलेल्या मृतदेह आणि इतर राज्यांतील करोना परिस्थितीबद्दल वार्तांकन केलं होतं. ज्यामुळे हा माध्यम समूह चर्चेत आला होता. दुसऱ्या लाटेत अनेक मालिका या वृत्तपत्राने चालवल्या होत्या. विविध राज्यातील कार्यालयांची तपासणी आयकर विभागाकडून केली जात असून, दैनिक भास्कर च्या भोपाळ, जयपूर आणि अन्य ठिकाणच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.