भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दरही भरमसाठ वाढले आहेत. पाकिस्तानी जनता आधीच फळे, भाज्या, पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे त्रासलेली असतानाच त्यांना अजून एक झटका बसला आहे तो दूधाच्या वाढत्या दरांचा.

कराची डेअर फार्मर्स असोसिएशनने दुधाच्या दरांमध्ये प्रति लिटर २३ रुपये इतकी वाढ केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमधील दुधाचे दर १२० रुपये प्रति लीटर इतके झाले आहेत. रिटेलमधील बाजार भावानुसार तर दुधाचे दर १८० रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचले आहेत. सरकारकडे आम्ही अनेकदा दरवाढ करण्यासंदर्भात मागणी केली होती. मात्र वेळोवेळी सरकारने आम्हाला या ना त्या कारणाने दरवाढ करण्यापासून रोखले. अखेर आम्ही स्वत:च दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे असोसिएशनने सांगितले आहे. दुसरीकडे प्रशासनाने दूध विक्री करणाऱ्या असोसिएशनने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. वाढीव दराने दूध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला शेतमालाचा पुरवठा बंद केला होता. त्यावेळी पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे दर २०० रुपये प्रति किलोपर्यंत वाढले होते. भारताने पाकिस्तानला टोमॅटोचा पुरवठा बंद केल्याने ही भाववाढ झाली होती. यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून भारताच्या या निर्यात बंदीच्या निर्यणाचा निषेध केला होता.

पाकिस्तानमध्ये महागाईचा दर ९.४१ टक्क्यांवर पोहचला आहे. २०१३ साली नोव्हेंबर महिन्यानंतर पहिल्यांदाच महागाईच्या दराने हा उच्चांक गाठला आहे. महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तानमधील केंद्रीय बँकांनी व्याजदर १०.७५ टक्के केले आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी पाकिस्तानमधील आपले प्लॅण्ट बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानची आर्थिक घडी बसवण्याचे मोठे आवाहन इम्रान खान सरकारसमोर आहे. त्यातच महागाई वाढत असल्याने जनतेमध्ये असंतोष वाढताना दिसत आहेत.