तामिळनाडूतील अण्णा द्रमुक पक्षाच्या एका दलित आमदारानं ब्राह्मण मुलीशी विवाह केल्याने मंदिराचे पुजारी असलेल्या मुलीच्या वडिलांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वडिलांनी मुलानं आपला विश्वासघात केल्याची तक्रारही पोलिसांत नोंदवली आहे.

ए. प्रभू (वय ३६) असं अण्णा द्रमुकच्या दलित आमदाराचं नाव आहे. त्याच आणि १९ वर्षीय सौंदर्या या ब्राह्मण मुलीचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आमदाराच्या निवासस्थानी सोमवारी त्यांचा विवाह पार पडला. या विवाहाला मुलीच्या वडिलांचा विरोध होता, त्यामुळे त्यांनी या विवाहाप्रसंगी मुलाच्या घरी जाऊन स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नुकतेच विवाह बंधनात अडकलेले आमदार आणि त्यांची पत्नी यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार नोंदवताना म्हटलं आहे की, प्रभूचे त्यांच्या मुलीवर गेल्या चार वर्षांपासून प्रेम होतं. ज्यावेळी मुलगी अल्पवयीन होती. मात्र, आमदार प्रभू यांनी आपल्या प्रेमप्रकरणाला केवळ चारच महिने झाले असल्याचं म्हटलं आहे.

मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलंय की, “प्रभू आमच्या घरीच लहाणाचा मोठा झाला आहे, त्याला आम्ही कायम मुलासारखं समजत होतो. मात्र, त्याने आमचा विश्वासघात केला. त्यानं आमच्या मुलीला आमिष दाखवून पळवून नेऊन लग्न केलं आहे, यापूर्वी ती या लग्नाला तयार नव्हती. कारण या दोघांच्या वयामध्ये १७ वर्षांचे अंतर आहे.”

मुलीच्या वडिलांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना आमदार ए. प्रभू यांनी आपली पत्नी सौंदर्यासोबत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात मुलीने आपले अपहरण केले नसल्याचे म्हटले आहे. तसेच तिने वडिलांचे सर्व आरोप फेटाळून लावत आपण कुटुंबियांकडे लग्नासाठी परवानगी मागितली होती मात्र त्यांनी नकार दिल्याने आपण घर सोडल्याचं तिनं म्हटलं आहे.