अॅट्रॉसिटी अॅक्टमधील बदलांविरोधात झालेल्या भारत बंदमधील हिंसाचारासाठी भाजपा जबाबदार असून हा बंद यशस्वी झाल्याने भाजपा घाबरला आहे. त्यामुळेच आता दलितांचे शोषण सुरु झाले आहे. दलित समाजातील निरपराध तरुणांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजपातील दलित खासदार हे स्वार्थी असल्याची टीकाही त्यांनी केली.

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली. भारत बंद यशस्वी झाला आणि त्यामुळेच भाजपा घाबरला. आता दलितांचे शोषण सुरु झाले असून तरुणांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. दलित समाजाने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजपाच्या दलित खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते. यावरुनही मायावतींनी निशाणा साधला. ‘भाजपाचे दलित खासदार स्वार्थी मानसिकतेचे आहेत. देशातील जनता या खासदारांना ओळखून आहे. आगामी निवडणुकीत दलित समाज त्यांना माफ करणार नाही, असेही त्या म्हणाल्यात. बसपची सत्ता आल्यास दलितांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

काय म्हणाले भाजपातील दलित खासदार?

भाजपाच्या महिला खासदार सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम मोदी सरकारला घरचा आहेर दिला होता. मी खासदार राहू अथवा न राहू, घटनेत बदल करू देणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. तर भाजपा खासदार उदित राज यांनी देखील मोदी सरकारला घरचा आहेर दिला होता. दोन एप्रिल रोजी झालेल्या आंदोलनात सहभागी होणा-या दलितांवर अत्याचाराच्या बातम्या येत आहेत, पण हे थांबायला हवं. दोन एप्रिलनंतर देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.